निपाणी नगरी वृत्तसेवा…(3)
समाधी मठाचे प्राणलिंग महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात यशस्वी दुसऱ्या वर्षात पदार्पण.
येथील श्री दत्तगुरु को-ऑपरेटिव्ह संस्थेचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. विरूपाक्षलिंग समाधी मठाचे मठाधिपती प्राणलिंग महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात हा सोहळा आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. संस्थेने आजच्या दिवशी दुसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण करत प्रगतीचा नवा टप्पा गाठल्याचे यावेळी ठळकपणे दिसून आले.
कार्यक्रमाची सुरुवात नटराज कला केंद्र, निपाणी येथील नर्तिका कु. स्नेहा पाटील यांच्या सुमधुर गणेश वंदनेने झाली. त्यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कदम यांनी आपल्या अमोघ वाणीने अत्यंत प्रभावीपणे केले. तर संस्थेचा लेखाजोखा व्यवस्थापक विशाल जासूद व महादेव कुंभार यांनी विशद केला.
यावेळी कोगनोळी दत्तगुरु संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सचिन खोत व दत्तगुरु को-ऑपरेटिव्हचे संस्थापक श्री. निलेश खोत यांनी आपल्या मनोगतात सांगितले, की “अल्पावधीतच सभासदांचा विश्वास आणि संचालक मंडळाच्या सहकार्यामुळे संस्था सक्षमपणे उभी राहिली आहे. समाजहित केंद्रस्थानी ठेवून पुढील काळात अधिक व्यापक उपक्रम राबवण्याचा संकल्प असल्याचे अधोरेखित केले.”
वर्धापन दिनाच्या औचित्यांने संस्थेने भोज व चिकोडी येथे दोन नवीन शाखा सुरू करण्याची घोषणा केली. यासोबतच येत्या काळात संस्थेतर्फे इंग्रजी शाळा, सार्वजनिक ग्रंथालय, समाजातील यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा मांडण्यासाठी बक्षीस वितरण समारंभ, तसेच रुग्णवाहिका सेवा संस्थेतर्फे उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय जाहीर करण्यात आला. या घोषणांना उपस्थिताकडून भरभरून दाद मिळाली.
कार्यक्रमात समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे व मागील पाच वर्षांमध्ये गडकोट मोहीम यशस्वी करणारे निपाणी येथील मावळा ग्रुपचे अध्यक्ष श्री आकाश माने, नर्तकी स्नेहा पाटील, यांचा स्वामीजींच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच अग्निवीर, कुस्ती क्षेत्रातील वीर, यशस्वी डॉक्टर तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते श्री रामदास दत्तात्रय पोवार या मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
यावेळी प्राणलिंग स्वामीजी यांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले, की “सेवा आणि समर्पण या दोन मूल्यांवर उभी असलेली संस्था समाजात परिवर्तन घडवते. परोपकाराच्या भावनेतून कार्य केल्यास यश निश्चितच प्राप्त होते.”
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, सभासद आणि नागरिकांनी संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. एकूणच, दुसऱ्या वर्धापन दिनाचा हा सोहळा प्रेरणादायी, समाजाभिमुख आणि भविष्यासाठी दिशादर्शक ठरला.
यावेळी श्री दत्तगुरु को-ऑपरेटिव्ह व कोगनोळी दत्तगुरु संस्थेचे सर्व शाखा व्यवस्थापक, कार्यकारी संचालक सभासद, ठेवीदार, कर्जदार, यांच्यासह मुख्य कार्यवाहक विदुला हेगडे, सौ.रूपाली निलेश खोत, नागपार्श्व संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रसन्नकुमार गुजर, उदय देवरुखे, डॉ. प्रमोद निळेकर नरेंद्र बाडकर, अरुण पाटील, रामदास पोवार, श्री बोरगले, आसावरी गंगाधरे, सुशांत जाधव, यांच्यासह सर्व संघ संस्थांचे पदाधिकारी, सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार विशाल जासूद यांनी मानले.