निपाणी नगरी वृत्तसेवा..(11)
ग्रामीण संस्कृतीतील मूल्यांची आधुनिक शिक्षणाशी सांगड घालणारा ‘टॅलेंट इन करेज’ उपक्रम ग्रँड सायन्स अकॅडमी मध्ये प्रेरणादायी ठरला
“मातीशी नाळ जपूनच आधुनिक जगात यश मिळवता येते” – श्री. युवराज पाटील
“आपण ज्या ग्रामीण संस्कृतीतून आलो आहोत, त्या संस्कृतीत शिस्त, परिश्रम, प्रामाणिकपणा आणि गुरूप्रती आदर ही मूल्ये खोलवर रुजलेली होती. पूर्वीची पिढी साधनसामग्री शिवायही केवळ मेहनत आणि संस्कारांच्या बळावर यशस्वी होत होती. मात्र आजचे जग पूर्णपणे बदलले आहे. स्पर्धा वाढली आहे, तंत्रज्ञान प्रगत झाले आहे आणि त्यामुळे आधुनिक युगात टिकायचे असेल तर अकॅडमीचे सखोल शिक्षण ही काळाची गरज बनली आहे,” असे प्रतिपादन श्री. युवराज पाटील यांनी केले.
ते काल “ग्रँड सायन्स अकॅडमी”(Grand Science academy) आयोजित ‘टॅलेंट इन करेज प्रोग्रॅम’ अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जे डी इंगळे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ते पुढे म्हणाले की, “आजचा विद्यार्थी हा केवळ पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित न राहता, कौशल्याधारित शिक्षण, संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि स्पष्ट ध्येय असलेला असला पाहिजे. ग्रामीण पार्श्वभूमी ही आपली कमजोरी नसून तीच आपली खरी ताकद आहे, फक्त तिला आधुनिक शिक्षणाची जोड देणे गरजेचे आहे.”
यावेळी त्यांनी देवचंद महाविद्यालया सारख्या शैक्षणिक संस्थेचे कौतुक करताना सांगितले की, “अशा महाविद्यालयां मधून ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना समान संधी मिळत असून, गुणवत्ता घडवण्याचे मोलाचे कार्य येथे सुरू असल्याचे सांगितले.
अकॅडमीमध्ये बोर्ड परीक्षा तयारी बरोबरच विविध क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील जेईई, नीट, मेडिकल, व्हीआयटी ,एनडीए, महाराष्ट्र व कर्नाटक सीईटी तसेच आठवी ते दहावी प्री फाउंडेशन कोर्स यांची तयारी करून घेतली जाते. अकॅडमी मधून अल्पावधीतच जवळपास 300 च्या वर विद्यार्थ्यांनी भारतातील व राज्यपातळीवरील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला असल्याचे सांगितले.
“शिक्षणाबरोबरच आरोग्य, मानसिक संतुलन आणि सकारात्मक दृष्टिकोन या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. केवळ डिग्री मिळवणे हे ध्येय नसून, समाजाला उपयोगी पडेल असा सक्षम नागरिक घडवणे हे खरे उद्दिष्ट असले पाहिजे,” असेही श्री. पाटील यांनी आपल्या भाषणात ठामपणे नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष भाई शाह होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व विशद करत, देवचंद महाविद्यालय हे गुणवत्तेचे केंद्र म्हणून अधिक बळकट करण्याचा मानस व्यक्त केला.
सीमा भागातील जवळपास 35 असून अधिक शाळेतील 950 विद्यार्थ्यांनी या ,”इनकरेज टॅलेंट “परीक्षेसाठी सहभाग नोंदवला त्यातून जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांचा आज सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला
महाविद्यालयाच्या प्राचार्य जे. डी. इंगळे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिस्त, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सतत नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याचा सल्ला दिला. तर सहकार रत्न डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांनी मानसिक व शारीरिक आरोग्य हे यशस्वी करिअरसाठी किती आवश्यक आहे, यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके, मानपत्रे व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. या गौरवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास व प्रेरणा निर्माण झाली.
ग्रामीण संस्कृतीतील मूल्ये जपत आधुनिक शिक्षणाची कास धरण्याचा संदेश देणारा हा ‘टॅलेंट इन करेज’ उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरला. कार्यक्रमास सर्व शाळा महाविद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक आभार ग्रँड सायन्स अकॅडमीच्या तेजस्विनी पाटील यांनी केले.