निपाणी नगरी वृत्तसेवा..(17)
देवचंद कॉलेज, अर्जुननगर व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत वाणिज्य विभागामार्फत आयकर, ऑनलाइन फायलिंग व शेअर मार्केट गुंतवणूक या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेच्या बीजभाषणात प्रा. एन. एल. कदम यांनी आयकर विषयातील ज्ञान व कौशल्यांच्या आधारे विद्यार्थी स्वतःचे उत्पन्न कसे वाढवू शकतात, तसेच या क्षेत्रातून तरुणांना रोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भारतीय करप्रणाली, नफा व वाढीचे गणित, ऑनलाइन फायलिंग, आयकर विवरणपत्र भरणे तसेच शेअर मार्केट मधील ऑनलाइन ट्रेडिंग या विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली.
कार्यशाळेचे उद्घाटन जलार्पणाने करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रा. सौ. एस. जी. मुळीक यांनी केले. देवचंद कॉलेजच्या प्राचार्या डॉ. प्रो. जी. डी. इंगळे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी वाणिज्य क्षेत्रातील बदलांची माहिती आत्मसात करून भारतीय करप्रणाली समजून घेत वैयक्तिक उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात साधन व्यक्ती मा. अक्षय कडगावे यांनी गुंतवणुकीचे विविध पर्याय, परतावा, ऑनलाइन ट्रेडिंग मधील जोखीम व जोखीम व्यवस्थापन या विषयांवर पीपीटीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात प्रा. किरण भोईटे यांनी आयकर विवरणपत्र स्वतः कसे भरावे, पॅन कार्ड काढण्याची प्रक्रिया, आधार–पॅन लिंकिंग तसेच ऑनलाइन रिटर्न भरण्याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी एम. व्ही. वाली यांनी भारतीय कररचना स्पष्ट करत १ एप्रिल २०२६ पासून लागू होणाऱ्या नवीन आयकर कायद्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत परिसरातील दहा महाविद्यालयांतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. वर्षा नार्वेकर व तृप्ती यादव यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगते व्यक्त केली.
या उपक्रमास जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्ती भाभी शाह व खजिनदार श्री. सुबोधभाई शाह यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास डॉ. एस. व्ही. मोहिते, डॉ. एस. ए. होडगे यांच्यासह अनेक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. गीता पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. एस. एम. अर्जुनवाडे यांनी केले.