निपाणी नगरी वृत्तसेवा..(2)
मराठा मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा, निपाणी येथे 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विज्ञान दिनानिमित्त विज्ञानावर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत 40 गट सहभागी झाले असून प्रत्येक रांगोळी साठी दोन विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी मानवी श्वसन संस्था, पचन संस्था, मेंदू, पृथ्वी, रक्ताभिसरण संस्था, मानवी उत्सर्जन संस्था, वैज्ञानिक उपकरणे, मानवी गुणसूत्रांच्या जोड्या, संशोधकांचे कार्य तसेच इस्रो च्या प्रेरणेने साकारलेले मंगलयान अभियान यांसारख्या विविध विज्ञानाधारित संकल्पना रांगोळीच्या माध्यमातून रेखाटल्या. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
कार्यक्रम शाळेतील ज्येष्ठ क्रीडाशिक्षक संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, तर दिलीप रावळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत कार्य करत आपल्या शाळेतून किमान एक विज्ञान संशोधक घडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. विज्ञान शिक्षिका आश्लेषा केसरकर यांनी दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले.
प्राजक्ता पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व आधुनिक जीवनातील विज्ञानाचे महत्त्व या विषयांवर विज्ञानाधारित गीत सादर करून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
इयत्ता सातवीतील विद्यार्थी वल्लभ जोशी यांनी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात विज्ञानाचा उपयोग कसा करावा याविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक बी. आर. मोहिते, एन. टी. खराडे, विशाल बुरुड, शुभांगी मोरे, प्रभा घाटगे, जी. पी. धंगे, मनीषा चव्हाण, रूपाली कराळे तसेच इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख शिल्पा कांबळे यांनी केले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र रघुनाथराव कदम, मराठा मंडळ शिक्षण समितीचे चेअरमन राजेश रघुनाथराव कदम, मार्गदर्शिका सौ. संगीता रवींद्र कदम व संचालिका सौ. ज्योती राजेश कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ सोमवार, दिनांक 2 मार्च 2026 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती शेवटी देण्यात आली.