चला, दिवाळी समजून घेऊया दिवाळी साजरी करूया!
निपाणी नगरी प्रतिनिधी (5)
बेळगाव मराठा मंडळ संचलित, मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये “दिवाळी सण मोठा” “नाही आनंदाला तोटा” या वाक्य प्रचाराची प्रचिती मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये पाहायला मिळाली. भारतीय संस्कृती ही विविध सणांनी नटलेली आहे आणि कालांतराने खऱ्या अर्थाने सण साजरे करणे हे कुठेतरी कालबाह्य होत आहे. त्यासाठी भारतीय सणांचा खरा आत्मा विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावा या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आले. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व आणि माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच प्रत्यक्षात वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांनी अनुभव घेऊन शाळेमध्ये ती साजरी केली. तसेच विद्यार्थ्यांनी प्रतापगडाची प्रतिकृती उभारली, हिंदू कॅलेंडरनुसार वर्षाचे बारा महिन्याचे तक्ते आणि सणवार, विष्णूचे दशावतार, पांडव पंचमी साकारण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या अंगातील सुप्त गुणांना वाव देत सुबक कौशल्य दाखवीत वेगवेगळे आकाश कंदील, पणत्या, आणि दिवे तयार केले होते. या दिवशी समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांनी शाळेला भेट देऊन मुलांचे गोड कौतुक केले व प्रोत्साहन दिले. तसेच विद्यार्थ्यांनी वाणिज्य कौशल्याचे ज्ञान घेऊन विविध वस्तूंच्या विक्रीचा अनुभव घेतला. शाळेच्या या उपक्रमाबद्दल समाजातील सर्व स्तरातून शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मराठा मंडळ, बेळगावच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू , शाळेच्या प्राचार्या सौ. स्नेहा आर. घाटगे, शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.