प्रभाग क्रमांक 15 मधून जास्मिन बागवान विजयी!
निपाणी नगरपालिका पोटनिवडणूक निकाल जाहीर!
निपाणी नगरी प्रतिनिधी (27)
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने काम करीत असलेले निपाणी नगरपालिकेचे माजी सभापती जुबेर बागवान यांच्या सुविद्य पत्नी जास्मिन बागवान यांनी प्रभाग क्रमांक 15 मध्ये विजयी सलामी देत प्रभागाचा विकास साधण्याची आपण दिलेली हाक विजयाच्या स्वरूपात प्रत्यक्षात उतरवली असून प्रभाग क्रमांक पंधरा मधील नागरिकांच्या अशा उंचावल्या आहेत. आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवतच सामाजिक कार्यात जर त्या अग्रेसर राहिल्या तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ वाढले असून नूतन नगरसेवक जास्मिन बागवान या माजी सभापती जुबेर बागवान यांच्या पत्नी आहेत. जुबेर बागवान यांनी मागील विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. पोटनिवडणुकीत भाजप कार्यकर्ते समर्थकांचे बागवान यांना मोठे पाठबळ मिळाले होते. पालिकेवर सध्या भाजपचे निर्विवाद वर्चस्व असून भाजप व काँग्रेस पुरस्कृत मिळून सत्ताधारी गटाचे 17 तर विरोधी उत्तम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे 13 नगरसेवक आहेत. यामुळे पालिकेत बागवान या सत्ताधारी गटासोबत जाणार हे निश्चित आहे. काँग्रेस पुरस्कृत गटाच्या नगीना मुल्ला यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक लागलेली होती.
मागील कांही दिवसापासून उत्सुकता लागून राहिलेल्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील नगरसेवक पदाच्या एका रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणूकीचा निकाल काल मंगळवारी जाहीर झाला. तिरंगी लढतीत जास्मिन जुबेर बागवान यांनी सर्वाधिक 687 मध्ये घेऊन बाजी मारली. प्रतिस्पर्धी आयेशा जावेद कोल्हापूरे यांना 404 तर शाहीन फारूक पटेल यांना 353 मते मिळाली.
प्रभाग क्रमांक 15 मध्ये एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली होती. यामुळे निकालाची प्रतिक्षा लागून राहिली होती. या प्रभागातील मतदान ईव्हीएम मशीनद्वारे झाल्याने काही वेळातच आरंभी पासून आघाडीवर असणाऱ्या जास्मिन बागवान यांना विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून पाटबंधारे विभागाचे अधिकारी ए. एस. पुजारी यांनी काम पाहिले. विजयाची चुणूक लागताच प्रभाग क्रमांक 15 मध्ये जल्लोषी मिरवणुकीसह आकर्षक बॅनर झळकत असल्यामुळे मिरवणूक अगदी लक्षवेधी ठरली.