प्राध्यापक अजित सगरे यांचे निधन!
दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार!
निपाणी नगरी प्रतिनिधी (30)
निपाणी तालुक्यातील साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक ,राजकीय ,घडामोडीवर परखड मत व्यक्त करणारी प्रसंगी अनेकांना त्याची चूक सुधारण्यास वेळ देऊन लागलीच त्याच्यावर अमली अंमलबजावणी करण्यास भाग पाडणारी सीमा चळवळीतील एक अग्रणी व्यक्ती प्राध्यापक श्री अजित सगरे काळाच्या पडद्याआड.
आज सकाळी त्यांच्या घरातील मंडळी नेहमीप्रमाणे त्यांना सकाळी बेडवरून उठवण्यास गेले असता झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे त्यांच्या बहिणींना समजले. लागलीच डॉक्टरांना बोलावून घेतले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यू समयी ते 65 वर्षांचे होते.
श्री सगरे हे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते त्यांच्या जाण्याने निपाणी परिसरातील अनेक विभाग पोरके झाले असून ही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे परिसरात बोलले जात असून त्यांच्या काळातील अनेक राजकीय घडामोडींचे याची देही याची डोळा साक्षीदार असल्याचे त्यांच्या संपर्कात आल्यानंतर समजत होते. ते मागील अनेक वर्षापासून दिव्यांगांचे आयुष्य जगत होते. ते आयुष्यभर अविवाहित राहिले असून त्यांचा सांभाळ त्यांच्या बहिण करत होत्या. आज सकाळी त्यांना अंथरुणातून उठवण्यासाठी त्यांच्या बहिण गेल्या असता त्यांची कोणतीच हालचाल झाली नाही. हे पाहून त्याच्या बहिणीने हंबरडा फोडला.
ते जरी अंथरुणांशी खिळून असले तरी त्यांच्यातील एक कार्यकर्ता मात्र त्यांनी अखंड जिवंत ठेवला होता. निपाणी तालुक्यातील कोणत्याही महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष असायचे, अशी कोणती घटना घडल्यास त्या घटनेतील व्यक्तीचा आपल्याकडे फोन नंबर नसल्यास कोणाकडून तरी उपलब्ध करून घेऊन त्याची विचारपूस करून त्या घडामोडी संदर्भातील माहिती गोळा करून त्या संदर्भातील आपले मत काय आहे. हे आवर्जून सांगण्याचा त्यांचा हातखंडा वेळोवेळी जाणवत होता. त्यांचा साहित्य विश्वातील वावर तरी वाखाणण्या जोगा होता. ज्येष्ठ साहित्यिक कै. महादेव मोरे यांच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात ते प्रत्यक्ष येऊ शकत नसले तरी आपल्या मित्राकडे त्यांना श्रद्धांजलीचा संदेश पाठवण्यास देखील ते विसरले नव्हते.
त्यांना भेटण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा परिसरातील अनेक नामवंत लेखक साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते स्वतः येऊन त्याची विचारपूस करून आपला अमूल्य वेळ देत त्यांच्याशी हितगुज करत असत. परवाच ज्येष्ठ साहित्यिक व लेखक दि.बा पाटील, मुंबईचे माजी वरिष्ठ पोलीस उप अधीक्षक एन.जे. पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी हितगुज केले होते. श्री सगरे यांच्या पश्चात त्यांच्या दोन विवाहित बहिणी आहेत. श्री सगरे यांच्यावर आज शनिवारी एक वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.