चांगल्या मानसिक आरोग्यासाठी मोबाईल वापराचे भान युवकांमध्ये हवे – प्रा. डॉ. अमोल नारे

निपाणी नगरी प्रतिनिधी (12)
देवचंद कॉलेज, अर्जुननगर येथील राष्ट्रीय सेवा योजना (कनिष्ठ विभाग) यांच्या मार्फत आयोजित ‘विशेष श्रमसंस्कार शिबिर’ अर्जुनी येथे आयोजित केले असून, ग्रामस्थांसाठी आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये बोलत असताना प्रा. डॉ . अमोल नारे यांनी, आजच्या आधुनिक काळात बदललेल्या जीवन पद्धतीमुळे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. विकसित तंत्रज्ञान, मोबाईलचा अमर्याद वापर यामुळे विद्यार्थी मानसिकदृष्ट्या कमकुवत बनत चालला आहे. सततच्या मोबाईल वापराने डोळ्यांचे आजार निर्माण होत आहेत. विविध ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या बालकांच्या समस्या पालकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. समायोजन क्षमता साधता न येणं ही मानसिक आरोग्य बिघडल्याची लक्षणे असू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्याने मानसिक आरोग्य जपण्यासाठी मोबाईलचा वापर कसा? किती?कशासाठी करावा याचे भान युवकांमध्ये हवे, असे मत डॉ. नारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनकर आडाव होते.
डॉ. अमोल नारे म्हणाले की, टी. व्ही.वरील मालिकांच्या प्रभावाने कुटुंबपद्धती बदलत चालली आहे, घरातील सुसंवाद हरवत चालला आहे. अगदी लहान मुले मोबाईलच्या आहारी जात आहेत, याची चिंता पालकांना आहे, पण मुलांचे हट्ट पुरवताना या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे. मुलांनी विविध खेळ, पुस्तके व निसर्ग अभ्यास सहल करणे आवश्यक आहे, त्यामुळे विद्यार्थी ताण तवापासून दूर राहतील तसेच सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने विद्यार्थी आभासी जीवन जगत आहे. वास्तविक जीवनापासून अलग राहत आहे. त्यामुळे बदलत्या समाज जीवनातील नियम समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी भविष्यामध्ये मानसिक समस्यांचे शिकार बनतील अशी भीती लोकमानसात निर्माण होताना दिसते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार भविष्यामध्ये मानवाच्या शारीरिक व्याधी पेक्षा मानसिक आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी विद्यार्थ्यांनी आपले मानसिक आरोग्य जपण्यासाठी विविध विधायक उपक्रमामध्ये सहभाग घेतला पाहिजे .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही.पी.पाटील यांनी, सूत्रंचालन प्रा. टी. ए. पाटील व आभार प्रा.बी.एस.कुंभार यांनी केले. या कार्यक्रमास सुदाम देसाई , पृथ्वीराज उन्हाळे, प्रकाश भोंगार्डे , दयानंद पेडणेकर आदी मान्यवर, रासेयो समिती सदस्य, अर्जुनी ग्रामस्थ व स्वयंसेवक उपस्थित होते.