देवचंद कॉलेजमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ पारितोषिक वितरण समारंभ संपन्न!
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. पांडुरंग पाटील यांची उपस्थिती!
निपाणी नगरी प्रतिनिधी (8)
देवचंद कॉलेज, अर्जुननगर, (महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग) आणि मराठी , हिंदी, इंग्रजी विभाग आयोजित ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये अभिवाचन स्पर्धा, वाचन संवाद स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, पुस्तक परिक्षण स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आज संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. पांडुरंग पाटील हे लाभले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लेखक कधीही व्यक्तिगत घडत नसतो. तो समाजातूनच घडतो. श्री. म. माटे, व्यंकटेश माडगूळकर यांसारख्या लेखकांचे साहित्य वाचन केल्याने प्रेरणा मिळत गेली. तरुणांनी एखादी तरी कला जोपासावी, त्यातून जीवन घडत जाते. विचारांचा निर्धार करा, त्यातून योग्य कृती घडत जाईल, असे विचार त्यांनी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ.जी. डी. इंगळे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी वाचनाकडे वळावे, वाचनाची आवड निर्माण झाल्यास आपण लेखनाकडे वळू लागतो. वाचनातून व्यक्तिमत्त्व विकास घडण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके वाचावीत असे मार्गदर्शन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रो. डॉ. रमेश साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आशालता खोत यांनी केले; तर आभार प्रा. बी.जी. पाटील यांनी मानले, या कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. प्रविणसिंह शिलेदार, प्रा. स्मिता पाटील, प्रा. ज्योती बुवा, डॉ. दिपा मडिवाळ यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य केले. प्रा. नानासाहेब जामदार ही कार्यक्रमास विशेष उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशीषभाई शाह यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला.