सैनिकी शाळेत प्रकाश कदम यांचा सत्कार!
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील हे होते!

निपाणी नगरी प्रतिनिधी (30)
उत्कृष्ट व्याख्याते, निवृत्त शिक्षक, प्रसिद्ध प्रवचनकार प्रकाश कदम यांना चेन्नई युनिव्हर्सिटी कडून डॉक्टरेट पदवी बहाल केल्याबद्दल कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल या सैनिकी संकुलात त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील हे होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील, प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील उपस्थित होते. प्रारंभी श्रीनिवास नलवडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून देताना प्रकाश कदम यांच्या विविध साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक व आध्यात्मिक कार्याबद्दल माहिती दिली. नंतर संस्थेचे सचिव कुमार पाटील यांच्या अमृत हस्ते सत्कारमूर्ती प्रकाश कदम यांना शाल, श्रीफळ व पुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी मनोगतात प्रकाश कदम यांनी सत्कारा बद्दल संस्थेचे आभार मानताना शैक्षणिक प्रवाहात विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड अवगत केली पाहिजे कारण वाचनाने मनुष्याची विचारशक्ती प्रगल्भ होते आणि त्यातूनच समृद्ध व्यक्तिमत्व घडू शकते हा विश्वास देताना शिक्षकांनीही आत्मविश्वासपूर्वक ज्ञानार्जणाचे सत्कार्य केले पाहिजे. शैक्षणिक प्रवाहात प्रत्येकाने विद्यार्थी होऊनच ज्ञानार्जन केले तर शिक्षण क्षेत्रात मोठी सकारात्मक क्रांती होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
यानंतर संस्थेचे सचिव कुमार पाटील यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण क्षेत्रात सखोल ज्ञानसंपन्न भूमिकेतून शिक्षकांनी ज्ञान दिले पाहिजे अशी भावना व्यक्त केली. यावेळी संकुलातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार पवार यांनी केले तर आभार विनोद परीट यांनी मानले.