मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळेत “व्यसनमुक्त भारत अभियान”!

निपाणी नगरी प्रतिनिधी (4)
मराठा मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळेमध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने “व्यसनमुक्त भारत अभियान” आणि “स्वरणीम भारत अभियान” या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी ब्रह्मा कुमारी विनाबहन, ब्रह्मा कुमारी सुप्रीया बहन, डॉ. मंजुषा बहन, ब्रह्मा कुमारी काशिनाथ भाई, अरुण भाई आणि मंजुनाथ भाई उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनशैली आणि योग व ध्यानधारणा (मेडिटेशन) यांचे महत्त्व पटवून दिले.
पान, तंबाखू, गुटखा, दारू आणि सिगारेटच्या सेवनामुळे शरीरावर गंभीर दुष्परिणाम होतात. तंबाखू मधील निकोटीणमुळे गालाचा व पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. यामुळे आर्थिक हानी होते. आणि कुटुंबाचे जीवनही विस्कळीत होते. मोबाईलवरील अतिवापर, व्हिडिओ गेम मुळे बौद्धिक क्षमता कमी होते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण, वेळेवर झोप, नियमित व्यायाम आणि चांगली पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला. तसेच, मेडिटेशन मुळे मनःशांती मिळते. आणि वाईट सवयी दूर होतात यावरही त्यांनी भर दिला. आत्मशुद्धी आणि सकारात्मक विचारसरणी आत्म्याचे ‘सात्त्विक भोजन’ आहे, असे प्रतिपादन करण्यात आले.
शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त भारत घडवण्याची प्रतिज्ञा घेतली “तंबाखू, गुटखा, दारू, बिडी, सिगारेटचा त्याग करू, आमचे गाव आणि देश व्यसनमुक्त करू!”
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक श्री. एस.एस. पाटील यांनी केले. पाहुण्यांचे आभार श्रीमती एन.टी. खराडे यांनी मानले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक बी.आर. मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, तसेच शिक्षकवृंद जे.पी. डंगे, एस.बी. कांबळे, पी.एस. पाटील, व्ही.एस. बुरुड, ए.एन. केसरकर, एस.एस. मोरे, पी.पी. पाटील, एम.ए. चव्हाण यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठा मंडळ निपाणीचे अध्यक्ष रवींद्र कदम, शिक्षण समितीचे चेअरमन राजेश कदम, मार्गदर्शिका संगीता कदम, संचालिका ज्योती कदम यांचे विशेष सहकार्य लाभले. शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.