नागरिकांनो सावधान! मागील काही दिवसापासून चोरीच्या घटनेत वाढ!
निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमा देवी यांची पत्रकार परिषद!

निपाणी नगरी प्रतिनिधी (7)
नागरिकांनो सावधान! एकंदरीत निपाणी व ग्रामीण परिसरामध्ये चोरीच्या घटना वाढतच चालल्या असून त्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दागिने चोरीच्या सात ते आठ घटना घडल्याने खळबळ उडाली असून या पार्श्वभूमीवर निपाणी व परिसरामध्ये सर्वत्र भित्तीपत्रके वाटपासह, रिक्षाद्वारे पोलिस प्रशासनाने परिसरात जनजागृती चालवली असून प्रशासनाच्या मदतीला देवचंद महाविद्यालयातील छात्र सेनेचे विद्यार्थी व व्हाईट आर्मीचे व्हॉटेंनटियर इतर शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सोबतीला घेण्यात येणार असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी गौडा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
त्यापुढे म्हणाल्या सध्या निपाणी शहराचा विचार करता लोकसंख्येच्या मानाने शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांची ही संख्या अपुरी पडत असुन प्रशासनावर त्याचा अतिरिक्त भार पडत असल्या कारणाने वरील उपाय योजना करत असून त्याच्या जोडीला अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असल्याचे बोलून दाखवले. पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी सरकारकडून अनुदान मिळत नसल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व नागरिकांनीच आता आपली सामाजिक जबाबदारी ओळखून आपल्या सर्व आस्थापनांच्या समोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे काळाची गरज बनली असून, ते कॅमेरे बसवताना बाहेरील दिशेला एखादा कॅमेरा असणे खूप गरजेचे असल्याचे सांगितले.
खबरदारीचा उपाय म्हणून महिलांनी सार्वजनिक ठिकाणी फिरताना सोन्याचे दागिने घालू नये, कमी रहदारी असलेल्या भागात एकटे फिरू नये, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, यात्रा आणि गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवा, घरात सोन्याचे दागिने, पैसे आणि मौल्यवान वस्तू असतील तर ते बँकेच्या लॉकर मध्ये ठेवण्याची व्यवस्था करावी, बसमध्ये चढताना व उतरताना आणि बसस्थानकावर दागिने, पैसे आणि मोबाईल सुरक्षित ठेवावेत. दागिने लुटी बरोबर फसवणुकीचे प्रकारे वाढले आहेत. तरी नागरिकांनी कोणत्याही गोष्टीला घाबरून न जाता असे काही प्रकार घडल्यास त्वरित निपाणी शहर पोलीस ठाण्यास कळवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.