सैनिक शाळेत दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न!

निपाणी नगरी प्रतिनिधी (13)
कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्रि मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने संकुलात दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील हे होते. प्रारंभी अभिनय नाईक यांनी कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक केले. नंतर मान्यवरांच्या अमृत हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील, प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील उपस्थित होते. नंतर उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार करून दहावी व बारावी विद्यार्थ्यांना पुष्प देऊन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संस्कृती कश्यप, पियुष हिरेकुडी, स्नेहल पाटील, साहिल बिरंबोळे,अर्जुन कुंभार, अथर्व मगदूम , ओमकार गुरव या विद्यार्थ्यांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या. नंतर श्रीनिवास नलवडे व सचिन बेलेकर यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. नंतर मुख्याध्यापिका कोमल पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना जीवनात केवळ पुस्तकी ज्ञान महत्त्वाचे नसून जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त, कष्ट, जबाबदारी, प्रामाणिकपणा, आणि संयम या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत असे सांगितले. प्राचार्य अनमोल पाटील यांनी जीवनात आपण नेहमी मोठी स्वप्ने पहावीत आणि ती साकार करण्यासाठी प्रयत्न करावीत कारण प्रत्येक संधी आणि आव्हाने तुमची वाट पाहत आहेत. जिद्दीने आणि मेहनतीने यशाचा पाठलाग करत रहा अशी त्यांनी सदिच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमाध्यक्ष कुमार पाटील यांनी समाजासाठी एक आदर्श विद्यार्थी बनून तुमच्या यशाने आमच्या मेहनतीला सार्थ ठरवा. आत्मविश्वास आणि मेहनत हीच तुमची खरी शिदोरी असली पाहिजे असे त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी संकुलातील सर्व शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा माने यांनी केले तर आभार वर्षा केनवडे यांनी मानले.



