निपाणी मंडल पोलीस निरीक्षक बी.एस तळवार यांना पोलीस प्रशस्ती पदक!
निपाणी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा!

निपाणी नगरी प्रतिनिधी (18)
कर्नाटक राज्य पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षक यांच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे पोलीस प्रशस्ती पदक यंदा राज्यातील 200 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आले आहे. यात बेळगाव जिल्हा पोलीस दलातील तिघांचा समावेश आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रुती एन. एस. यांच्यासह निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक तथा सी.पी.आय श्री.बी. एस. तळवार आणि जिल्हा पोलीस मुख्यालयातील हवालदार श्रीशेल बळीगार यांना हे पदक जाहीर झाले आहे. शनिवारी रात्री उशिरा या संदर्भातील घोषणा करण्यात आली.
गृहमंत्रालयाच्या अखत्यारितील राज्य पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षक यांच्यावतीने चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्ती पदक दिले जाते. गेल्या पाच वर्षांतील कामाची दखल घेऊन हे प्रशस्ती पदक दिले जाते. त्याप्रमाणे निपाणीचे सी.पी.आय श्री. बी. एस. तळवार यांनी सी.पी.आय पदाच्या कार्यकाळात तसेच निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदी असताना अनेक खून, दरोडा, खंडणी प्रकरणांचा उलगडा केला होता. कोविडच्या काळात आंतरराज्य मार्गावरील कोगनोळी टोलनाका येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. महापूर काळातही पूरग्रस्तांच्या स्थलांतर मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. या सर्व कार्याची दखल घेऊन 2024-25 या वर्षासाठी श्री तळवार यांची प्रशस्ती पदकासाठी निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. व त्यांची या पदकासाठी निवड झाल्याने निपाणी तालुका पोलीस ठाण्यात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.