Crime गुन्हाEntertainmentआपला जिल्हाकृषीक्राईमक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिकसंपादकीय [Editorials]

आज पर्यावरण दिन : घोषणांचं जंगल, कृतीचा दुष्काळ

नगरपालिकेतील पर्यावरण विभाग कागदावरच!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (5)

आज ५ जून – जागतिक पर्यावरण दिन. जगभरात आजच्या दिवशी पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केलं जातं. १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचा उद्देश होता लोकांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता वाढवणं आणि पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव करून देणं. मात्र वर्षागणिक या दिनाचं स्वरूप केवळ औपचारिकते पुरतं मर्यादित होत चाललं आहे. निपाणी नगरपालिकेतील पर्यावरण विभाग देखील यासाठी उत्तम उदाहरण आहे. कागदावरील घोडे नाचवत पर्यावरण विभाग फक्त दिखावा करतो.

प्रत्येक वर्षी वृक्षारोपणाच्या घोषणा मोठ्या थाटामाटात केल्या जातात. उद्घाटनाचे कार्यक्रम, फोटोसेशन्स, भाषणं हे सर्व एका दिवसापुरतं मर्यादित राहतं. अनेकदा ही झाडं लावल्यानंतर दोन दिवसांतच गायब होतात. कागदावरच्या वनराई आणि प्रत्यक्षात उघड्या माळरानावर असलेल्या मोकळ्या जागा – ही वास्तवातली तफावत काळजाला चटका लावते.

शहरांचा झपाट्याने होणारा विस्तार, औद्योगिक प्रकल्पांना दिले जाणारे परवाने, आणि ते देताना पर्यावरणीय अभ्यास अहवालांची होणारी थट्टा, हे सारे चित्र अधिकच काळजीकारक आहे. प्रशासन आणि सरकारी अधिकारी याकडे केवळ ‘फाईल पूर्ण’ करण्याच्या दृष्टीने पाहतात. पर्यावरण रक्षणाच्या बाबतीत त्यांची उदासीनता स्पष्ट दिसून येते.

या परिस्थितीत पर्यावरण प्रेमींनी सुरू केलेल्या चळवळी आशेचा किरण आहेत. मात्र त्यांनाच समाजात आणि प्रशासनातही उपेक्षित वागणूक दिली जाते. झाडं लावणारे, प्लास्टिक विरोधात बोलणारे, नदी-नाल्याचं स्वच्छतेसाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते अनेकदा “अति उत्साही” समजून दुर्लक्षित होतात. हे चित्र बदलायला हवं. प्लास्टिक बंदी कागदावर ठेवत निपाणी पासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या वसाहतीत राजरोस पणे प्लास्टिकचे उत्पादन होत असल्याची ऐकीव बातमी आहे. यामध्ये देखील पर्यावरण विभागाची अनास्था दिसते.

पर्यावरण रक्षण ही केवळ वृक्षारोपणावर सीमित राहणारी गोष्ट नसून, त्यात सातत्य आणि कृती लागते. झाडं लावणं जितकं महत्त्वाचं, तितकंच त्यांचं संरक्षण करणंही गरजेचं आहे. शालेय स्तरावर पर्यावरण शिक्षण अधिक परिणामकारकपणे दिलं पाहिजे. स्थानिक नागरिकांचा पर्यावरण योजनांमध्ये थेट सहभाग असला पाहिजे. सुका कचरा, ओला कचरा आणि घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक यंत्रणा स्थानिक पातळीवर उभारणं ही काळाची गरज आहे. पर्यावरण प्रेमींना या उपक्रमांमध्ये सामावून घेतलं, तर केवळ कचऱ्याचं व्यवस्थापनच होणार नाही, तर त्यातून कंपोस्ट खते निर्मितीचे प्रकल्पही साकारू शकतात. यातून सेंद्रिय शेतीला चालना मिळेल, तर रोजगार निर्मितीचे नवीन दरवाजेही खुले होतील.

आजच्या दिवशी केवळ घोषणांच्या जंगलात अडकून न पडता, कृतीच्या वाटेवर पाऊल टाकणं गरजेचं आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणं हे आता ऐच्छिक न राहता अपरिहार्य बनलं आहे. आपण जर आजच पर्यावरणाची काळजी घेतली नाही, तर उद्या जगण्यासाठी केवळ आठवणी आणि घोषणा शिल्लक राहतील.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!