मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळेत कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा!

निपाणी नगरी प्रतिनिधी (12)
येथील मराठा मंडळ संचालित मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा, निपाणी येथे पारंपरिक कर्नाटकी बेंदूर सण अत्यंत उत्साहात, आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण संस्कृती, कृषीप्रती निष्ठा आणि परंपरेचे महत्त्व समजावे या उद्देशाने शाळेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात वाद्यांच्या गजरात, पारंपरिक पोशाखातील विद्यार्थ्यांनी सजवलेल्या बैलजोडीच्या भव्य मिरवणुकीने झाली. शाळेच्या परिसरात पारंपरिक नृत्य, लेझीम, फुगड्या आणि हलगीच्या गजरात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मिरवणुकीनंतर शाळेच्या प्रांगणात पारंपरिक पद्धतीने बैलजोडीचे पूजन करण्यात आले.
मराठा मंडळ शिक्षण समितीचे चेअरमन श्री. राजेश रघुनाथराव कदम यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना शेती, पशुधन व ग्रामीण संस्कृतीच्या जपणुकीचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमास मराठा मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्री. रवींद्र रघुनाथराव कदम, मार्गदर्शिका सौ. संगीता रवींद्र कदम, तसेच संचालिका सौ. ज्योती रवींद्र कदम यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या व ग्रामीण संस्कृती जपण्याच्या शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाला प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. आर. मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमोल पाटील, तसेच शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये एस.एस. पाटील, एन.टी. खराडे, शिल्पा कांबळे, विशाल बुरुड, प्राजक्ता पाटील, प्रभा घाटगे, जयश्री हांडे, आश्लेषा केसरकर, शुभांगी साळवे, मनीषा चव्हाण यांचा सक्रिय सहभाग होता. पालकांचाही उत्तम प्रतिसाद लाभला.
कर्नाटक बेंदूर हा सण शेतकरी समाजासाठी विशेष महत्त्वाचा आहे. या दिवशी बैलजोडीचे पूजन करून त्यांच्या योगदानाची आठवण ठेवली जाते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, कृतज्ञता आणि संस्कृतीचे भान निर्माण होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळेचे कौतुक करण्यात येत आहे.