निपाणी नगरी वृत्तसेवा (6)
“श्री संत बाळूमामांच्या पालखी सोहळ्याने तहसिलदार प्लॉट निपाणी भक्तिमय होणार; “मुका प्राणीही जीवच” हा संदेश पुन्हा घरोघरी पोहचणार!तहसीलदार प्लॉट येथे 11 मे रोजी पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन; भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.”
जनकल्याण, दया, श्रद्धा आणि मुक्या प्राण्यांवरील अपार प्रेम यांचे प्रतीक मानले जाणारे श्री सद्गुरू संत बाळूमामा यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन सोमवार दि. 11 मे 2026 रोजी निपाणीतील तहसीलदार प्लॉट परिसरात करण्यात आले आहे. या निमित्ताने भक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून परिसर भक्तिमय होणार आहे.
“बकरी जैसा प्राणी, तोही ठेविला चरणी… मग माणसा ऐसा गुणी, कां न ठेवी!” या संत बाळूमामांच्या विचारातून मानवतेचा मोठा संदेश समाजाला मिळतो. मुक्या प्राण्यांनाही माया, जिव्हाळा आणि संरक्षण मिळाले पाहिजे, ही शिकवण आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी युगात अधिक महत्त्वाची ठरत आहे. संत बाळूमामांनी आयुष्यभर बकऱ्यांची सेवा करत समाजाला करुणा, समता आणि जीवमात्रांवरील प्रेम यांचा आदर्श दिला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 ते 9 या वेळेत मूर्ती अभिषेक व पूजनाने होणार असून सकाळी 9 वाजता श्री सिद्धीविनायक गणेश मंदिर, तहसीलदार प्लॉट, निपाणी येथून पालखी प्रस्थान होणार आहे. सकाळी 9 ते 11 या वेळेत पालखी सोहळा पार पडणार असून त्यानंतर आरती व भाकणुककार लक्ष्मण हिरवे महाराज यांचा भाकणुक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 12:30 पासून महाप्रसादाचा लाभ भक्तांना घेता येणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन श्री. अरविंद धोंडिबा लाखे यांच्या निवासस्थानी, तहसीलदार प्लॉट दुसरी गल्ली, निपाणी येथे करण्यात आले आहे. आयोजकांनी सर्व बाळूमामा भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ भक्तीच नव्हे, तर “प्राणिमात्रांवर प्रेम करा, दया ठेवा आणि मानवतेचा मार्ग स्वीकारा” हा सामाजिक संदेशही देण्यात आला. विशेष म्हणजे संत बाळूमामांच्या जीवनातील बकऱ्यांचे महत्त्व हे फक्त धार्मिक श्रद्धेपुरते मर्यादित नसून, प्रत्येक जीवामध्ये देव पाहण्याची शिकवण त्यातून समाजाला मिळते.