सैनिकी शाळेत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न!

निपाणी नगरी प्रतिनिधी (5)
कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्री मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने संकुलात संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आंतरशालेय वकृत्व स्पर्धा संपन्न झाल्या . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील हे होते . तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या संस्थापिका रेखा पाटील, प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील , माणिक शिरगुप्पे हे उपस्थित होते. प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक आरती कारागीर यांनी केले . नंतर प्रमुख मान्यवरांच्या अमृत हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले . यावेळी उपस्थित मान्यवरांचा संयोजकांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला . प्राचार्य अनमोल पाटील यांनी शालेय जीवनातील वक्तृत्व स्पर्धा ही एक महत्त्वाची उपक्रमात्मक स्पर्धा असल्याचे सांगितले. मुख्याध्यापिका कोमल पाटील यांनी मनोगतात प्रभावी भाषणामुळे नेतृत्व गुण , संघटन शक्ती व इतरांना प्रेरित करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते असे सांगितले. संस्थापिका रेखा पाटील यांनी वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासास चालना मिळते असे सांगितले .
यावेळी या स्पर्धेचे नियम व अटी अभिनय नाईक यांनी सांगितले. यावेळी विविध गटातील स्पर्धा संपन्न झाल्या . या स्पर्धेमध्ये कर्नाटक व महाराष्ट्र भागातील शालेय विद्यार्थी सहभागी होते. पाचवी ते आठवी या लहान गटांमध्ये हर्षदा पाटील प्रथम , प्रतीक्षा पाटील द्वितीय , सिद्धीका गोरडे तृतीय व शौर्य ठोंबरे उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला आहे तसेच नववी ते बारावी या मोठ्या गटांमध्ये सलोनी कुरुंदवाडे प्रथम , सुजय यादवाडे द्वितीय, प्राची मोहिते तृतीय तसेच पारितोष पाटील व श्रेया सौंदलगे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केले आहेत. या स्पर्धेचे परीक्षण विनोद परीट, तुषार पवार ,किरण संकपाळ ,सचिन बेलेकर ,प्रज्ञा माने , त्रिशला दत्तवाडे यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र , रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात आले . तसेच सहभागी स्पर्धकांनाही प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बेलेकर यांनी केले तर आभार शिवानंद ऐवाळे यांनी मानले.



