निपाणी नगरी वृत्तसेवा अक्कोळ, प्रतिनिधी (3)
श्री बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित श्री पार्श्वमती विद्यालय, अक्कोळ येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील प्रथम पालक सभा उत्साहपूर्ण वातावरणात व मोठ्या संख्येने पालकांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरुवात सौ. अनिता पाटील, श्री राजू पाटील, श्री सुंदर पाटील, श्री दादासाहेब मगदूम, सन्मती रांगोळे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते परमपूज्य गुरुदेव १०८ श्री समंतभद्र महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. राकेश तावदारे यांनी विद्यालयाची शैक्षणिक वाटचाल, विकासात्मक उपक्रम, शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच आगामी शैक्षणिक नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पालकांनी विद्यालयाशी सातत्याने समन्वय ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यालयाचे आधारस्तंभ श्री राजू पाटील यांनी विद्यालयासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगून, भविष्यातही विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या चेअरमन सौ. अनिता पाटील या होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यालयात सर्व शैक्षणिक व सहशालेय उपक्रम नियमानुसार राबविले जात असून शिक्षकवृंद प्रामाणिकपणे कार्य करीत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पालकांनी विद्यालयाला सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पी. बी. कळंत्रे यांनी केले, तर सौ. व्ही. डी. इंदळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शाळा–पालक समन्वय अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही सभा अत्यंत फलदायी ठरल्याचे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले.