निपाणी नगरी वृत्तसेवा (4)
अर्जुनगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या पोरांनी २०२५-२६ च्या शिष्यवृत्ती परीक्षेत असा काही डंका वाजवलाय की, बघणारे बघतच राहिले! नेहमी मोबाईलमध्ये ‘स्क्रोलिंग’ करणाऱ्या या युगात, या शाळेच्या तब्बल २१ विद्यार्थ्यांनी ‘स्कॉलरशिप’वर थेट स्वतःचा हक्कच सांगून टाकला आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता आठवी) विद्यालयातील तब्बल २१ विद्यार्थी पात्र ठरले असून, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता पाचवी) जान्हवी दादासाहेब वडगुले हिने राज्यात सहावा आणि तालुक्यात पहिला क्रमांक पटकावून शाळेची कॉलर एकदम टाईट केली आहे. तिच्या सोबतीला अर्णव म्हाटवळ यानेही जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवत ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले.
गणिताचे ‘जादूगार’ तोडकर सर: स्पर्धा परीक्षांचे खरे शिल्पकार!
आता एवढा मोठा पराक्रम गाजवायचा तर पडद्यामागे कोणीतरी ‘मास्टरमाईंड’ पाहिजेच ना? ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती मिळवून देण्यात मोहनलाल दोशी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक एस. डी. तोडकर यांचा सर्वात मोठा हात (आणि डोकेही!) आहे.
गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय म्हणजे बहुतेकांसाठी ‘नाकापेक्षा मोती जड’ असणारा प्रकार! पण तोडकर सरांनी अशा काही क्लुप्त्या, शॉर्टकट तंत्र आणि भन्नाट ट्रिक्स शिकवल्या की, पोरांना अवघड प्रश्न सोडवणे म्हणजे ‘डाव्या हाताचा खेळ’ वाटू लागले. परीक्षा हॉलमध्ये ‘डोके खाजवत’ बसण्यापेक्षा सरांच्या हुशार विद्यार्थ्यांनी थेट गुणांची लुटालूट केली. सरांच्या याच मेहनतीमुळे आणि तळमळीमुळे ते विद्यार्थ्यांचे लाडके आणि ‘सुपरहिट’ शिक्षक बनले आहेत.
गुणवंतांची लागली लाईन!
आठवीच्या परीक्षेत प्रतीक कदम याने ३०० पैकी २६० गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या पाठोपाठ शौर्य पाटील (२५८), शिवकुमार झळके (२५६), साईराज जाधव (२५२), ज्ञानेश्वरी पोवार (२४६), गिरीजा कुंभार (२३८), अर्णव पाटील (२३६), शरयू कुंभार (२३४), प्राजक्ता कुंभार (२३२), गौरी भोसले (२३२), श्रावणी यादव (२३२), ऋषीराज कदम (२३०), प्रीतम गेंगे (२२८), आराध्या पाटील (२२६), शिराज नदाफ (२२४), अन्विक्षिक कांबळे (२२२), पृथ्वीराज दबडे (२२०), समर्थ पाटील (२१८), प्रांजली दुरडे (२१६), काव्यांजली चौगुले (२१४) आणि श्रेया कांबळे (२०८) यांनी परीक्षेत थेट ‘सिक्सर’ मारत घवघवीत यश मिळवले.
या ऐतिहासिक यशामुळे ज. शि. मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले, स्वतः एस. डी. तोडकर, व्ही. आर. पाटील, आर. डी. देसाई, पी. एस. सावळवाडे, आर. आर. खपले आणि सर्व शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले. सध्या संपूर्ण परिसरात याच ‘स्कॉलर’ गँगची जोरदार चर्चा सुरू आहे!