“नळ कोरडे, रस्ते मात्र पाण्याने ओले! निपाणीत जलवाहिनी गळतीकडे दुर्लक्ष; उष्णतेच्या काळात हजारो लिटर पाणी वाया गेल्याने प्रशासनावर टीका पाण्याच्या थेंबाला किंमत नाही का? आधीच तीव्र टंचाई, त्यात जलवाहिनीला गळती; निपाणी पालिकेच्या निष्काळजीपणामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर, नागरिक संतप्त”
निपाणी नगरी वृत्तसेवा (24)
एकीकडे प्रचंड उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झालेले, विहिरी-टाक्या कोरड्या पडण्याच्या मार्गावर, अनेक भागांत पाण्यासाठी लोकांना दिवसन्दिवस प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे निपाणी शहरात मात्र हजारो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहून जात असल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे. बेळगाव नाका परिसरातील जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने मागील तीन दिवसापासून दिवसभर जुन्या पीबी रोडवर पाणी वाया जात होते. मात्र याकडे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे संबंधित जलवाहिनी योग्य स्थितीत नसल्याची आणि ती फुटण्याची शक्यता असल्याची माहिती स्थानिकांकडून यापूर्वीच देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तरीदेखील वेळेत दुरुस्ती न केल्याने अखेर जलवाहिनीला गळती लागली आणि हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. उष्णतेच्या तडाख्यात प्रत्येक थेंबासाठी जनता झगडत असताना प्रशासन मात्र निवांत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
24 तास पाणी योजनेच्या काळात गळतीचे पाणी चक्क रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनचालक आणि पादचारी यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांनी संताप व्यक्त करत “जनतेला पाण्यासाठी हेलपाटे, आणि प्रशासनाकडून पाण्याची उघड उधळपट्टी” अशी प्रतिक्रिया दिली. काही भागांत आठ-आठ दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाणे ही गंभीर बाब असल्याचे मतही व्यक्त होत आहे.
दरम्यान, ही गळती दुरुस्त करण्यासाठी मुख्य पाणीपुरवठा बंद करावा लागणार असल्याने शहरातील पाणीपुरवठा आणखी काही दिवस उशिराने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच टंचाईने त्रस्त नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. विशेष म्हणजे सायंकाळपर्यंत तरी गळती दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसून आली नव्हती. त्यामुळे “पालिका प्रशासनाला जनतेच्या समस्यांचे खरेच गांभीर्य आहे का?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
शहरात आधीच पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. कुठे कमी दाबाने पाणी, कुठे अनियमित पुरवठा, तर कुठे अनेक दिवस नळ कोरडे अशी परिस्थिती असताना तांत्रिक बिघाड आणि निष्काळजीपणामुळे परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची गरज वाढत असताना प्रशासनाने तातडीने गळती दुरुस्त करून पाणीपुरवठ्याचे सक्षम नियोजन करावे, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
“पाणी अडवा, पाणी जिरवा”चे फलक लावणाऱ्या यंत्रणांनी आधी शहरातील गळती थांबवावी, अशी उपरोधिक प्रतिक्रिया देखील नागरिकांतून उमटत आहे.