निपाणी नगरी वृत्तसेवा दि. ( प्रतिनिधी -25) :-
अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून निपाणी शहराची ओळख चळवळीचे व परिवर्तनाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. येणाऱ्या काळात या शहराची ओळख वृक्षांचे शहर म्हणून झाली पाहिजे. असे प्रतिपादन निपाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत गुंडे यांनी वृक्षमित्र विठ्ठल वाघमोडे यांची नेचर क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना आपले मत व्यक्त केले. त्यावेळी पुढे प्रशांत गुंडे म्हणाले वृक्षवल्ली आम्हा सोयरे… “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” ही संत तुकाराम महाराजांची वाणी आजच्या काळात अधिक महत्त्वाची वाटते. वृक्ष हे केवळ निसर्गाचे सौंदर्य नसून मानवाचे खरे जीवनसाथी आहेत. ते आपल्याला प्राणवायू, सावली, फळे, औषधे आणि पावसाचे संतुलन देतात. वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि जंगलतोड यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. अशा आधुनिक युगात वृक्षलागवड ही काळाची गरज बनली आहे. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन केले, तर भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा आणि सुंदर पर्यावरण मिळू शकते. वृक्ष वाचवणे म्हणजेच जीवन वाचवणे होय.” असे आपले मनोगत व्यक्त करून त्यांनी वृक्षमित्र वाघमोडे यांचा सत्कार केला. त्यांच्यासोबत नेहमीच सामाजिक कार्यात तत्पर असणारे निपाणीतील एक उमदे व्यक्तीमत्व व सामाजिक कार्यकर्ते दीपक वळीवडे यांचा देखील फाउंडेशन च्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी फाउंडेशनचे, प्रा नानासाहेब जामदार, साहित्यिक कबीर वराळे गुरुजी, निपाणी नागरिक मंचचे अध्यक्ष सुनील पोळ, महेंद्र सांगावकर, उद्योजक दीपक इंगवले, बाबासाहेब मगदूम, सर्जेराव हेगडे, मोहन कोकाटे, इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार फोर जेआर ह्यूमन राईट संघटनेचे अशोक खांडेकर यांनी मांडले.