निपाणी नगरी वृत्तसेवा (11)श्रीपेवाडी
“सामाजिक बांधिलकी आणि दातृत्वाचा वारसा जपत बेडकीहाळ येथील श्री वेंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट (साखर कारखाना) प्रशासनाने पुन्हा एकदा आपले दातृत्व सिद्ध केले आहे. स्थानिक शिक्षण क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या या कारखान्याने जी. एम. संकपाळ हायस्कूलला तब्बल दोन लाख रुपयांची भरीव मदत सुपूर्द केली आहे. कारखान्याच्या या सकारात्मक आणि स्तुत्य निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठा हातभार लागणार आहे. केवळ उद्योग व्यवसाय न सांभाळता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या या कारखान्याच्या औदार्याचे सर्वस्तरातून भरभरून कौतुक होत आहे. या मदतीमुळे कारखान्याने उद्योग आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा एक आदर्श मेळ घालून दिला आहे.”
श्रीपेवाडी श्री. जी. एम. संकपाळ हायस्कूल, श्रीपेवाडी येथे दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी शॉर्टसर्किटमुळे संगणक कक्ष व कार्यालयाला आग लागून मोठे नुकसान झाले होते. या संकटाच्या काळात शाळेच्या मदतीला धावून येत वेंकटेश्वर पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड, बेडकिहाळ यांच्या वतीने शाळेला रु. २ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली.
शॉर्टसर्किटमुळे संगणक कक्षातील संगणक, शैक्षणिक साहित्य तसेच कार्यालयातील महत्त्वाच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शाळेचे शैक्षणिक कामकाज पूर्वपदावर आणण्यासाठी आर्थिक मदतीची गरज होती. ही बाब लक्षात घेऊन वेंकटेश्वर पॉवर प्रोजेक्ट लिमिटेडने सामाजिक बांधिलकी जपत शाळेला रु. २ लाखांची मदत केली.
ही मदत स्वीकारताना संस्थेचे चेअरमन डॉ. अशोक पुजारी, ज्येष्ठ संचालक दगडूआण्णा चेंडके, श्री. गजानन शिंदे, मुख्याध्यापक जे. एस. जाधव, एस. डी. पोवार यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या वतीने वेंकटेश्वर पॉवर प्रोजेक्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित सर्व पदाधिकारी यांचे आभार मानण्यात आले. संकटाच्या काळात शाळेच्या पाठीशी उभे राहून केलेली ही मदत शाळेसाठी मोलाची असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच बळ देणारी आहे, अशी भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.