निपाणी नगरी वृत्तसेवा (9)
“अशोकनगर मध्ये पारस सौहार्द सहकारी संघ संस्थेच्या नवीन शाखेचा दिमाखदार प्रारंभ; केएलई संस्थेचे गौरवाध्यक्ष पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते उद्घाटन”
निपाणीतील सहकार क्षेत्राने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठे बळ दिले आहे. पारदर्शक कारभार, साखर कारखाने आणि विविध वित्तीय संस्थांच्या माध्यमातून सामान्यांचा सहकारा वरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे प्रतिपादन केएलई संस्थेचे गौरवाध्यक्ष पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले. रविवारी (ता. ९) अशोकनगर येथे पारस सौहार्द सहकारी संघ संस्थेच्या नवीन शाखेचे उद्घाटन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
कार्यक्रमात प्रथम फीत कापून शाखेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले, त्यानंतर दीपप्रज्वलन झाले. निपाणी शाखेचे नूतन संचालक आतिश खोत यांनी स्वागत केले. प्रास्ताविक करताना उपाध्यक्ष एडवोकेट रविराज पाटील यांनी सांगितले की, बेळगाव मधील मुख्य संस्थेने २८ कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा गाठला असून विश्वास, निष्ठा आणि समृद्धी या मूल्यांच्या आधारे संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. आजच पहिल्या दिवशी निपाणी शाखेसाठी एक कोटीचे ठेवी उपलब्ध झालेल्या असून त्या सर्व ठेवीदारांचे आभार देखील मानण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष संतोष पाटील म्हणाले, “पारस सौहार्द संस्थेने स्थापनेपासूनच ग्राहकांच्या विश्वासाला आणि हितसंबंधांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सभासदांना अधिक गतिमान व पारदर्शक सेवा देण्याचा आमचा मानस आहे.”
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, “निपाणीला सहकाराची मोठी पार्श्वभूमी लाभली आहे. जुन्या काळात आम्ही निपाणीत पहिल्यांदा टोबॅको डीलर फेडरेशन स्थापन केले होते, त्याचा संस्थापक मी होतो. सध्या निपाणीत सहकारी संस्थांचे वाढते जाळे हे सामान्यांच्या प्रगतीचे लक्षण आहे. आमदार अभय पाटील आणि अध्यक्ष संतोष पाटील यांच्या नेतृत्वात पारस संस्थेने अल्पावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून, निपाणी शाखा निश्चितपणे मोठी भरारी घेईल.”
मनोगत व्यक्त करताना आमदार अभय पाटील म्हणाले, “डॉ. प्रभाकर कोरे यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवले आहे. आता डॉ. कोरे यांना राज्यपाल पदाची संधी मिळावी, ही राज्यातील जनतेची इच्छा आहे. केवळ राजकारण न करता गरीब, सामान्यांची बांधिलकी जपण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर आपले काम सुरू आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य मिळत असून डॉ. कोरे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन झाल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”
आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, “निपाणीत अनेक सहकारी संस्था वाढत असल्याचा अभिमान वाटतो. पारस संस्थेचे व्यवस्थापन पारदर्शी असून, निपाणीकराचे या संस्थेला नेहमी सहकार्य राहील.”
यावेळी राजेश कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयकुमार खोत, स्थानिक संचालक अक्षय पुरंत, प्रसन्न दोशी, मिलिंद कमते यांच्यासह मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशाल रांगोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.