निपाणी नगरी वृत्तसेवा..(13)
“निपाणी अकोळ रोड वरील श्री सोमनाथ मंदिरात महाशिवरात्री उत्सवाची भक्तीमय तयारी सुरू, शिव आराधना, ध्यान साधना, रुद्राभिषेक व महाप्रसादाचे आयोजन; भाविकांना उपस्थितीचे आवाहन”
येथील अकोळ रोड वरील सोमनाथ मंदिर निपाणी येथील मंदिरात महाशिवरात्री उत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० ते १ या वेळेत शिव आराधना, ध्यान साधना व रुद्राभिषेक कार्यक्रम होणार असून, बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता ब्रह्मपूजा, सामूहिक आरती व ढोल-ताशांच्या गजरात महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या उपासनेचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी उपवास, जप, रुद्राभिषेक व रात्रभर जागरण करून शिवभक्त भगवान शिवाची आराधना करतात. शिवतत्त्वाशी एकरूप होण्याची, मन:शांती व आध्यात्मिक शक्ती प्राप्त करण्याची ही रात्र असल्याची धार्मिक मान्यता आहे. महाशिवरात्रीचे व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात व जीवनात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, अशी श्रद्धा भाविकांत आहे.
या उत्सवानिमित्त श्री सोमनाथ मंदिरात भक्तांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून, सुव्यवस्थित नियोजनासाठी मंदिर भक्त मंडळाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रसादासाठी धान्य व देणगी मंदिर कार्यालयात स्वीकारली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
निपाणी शहर व परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाशिवरात्री उत्सव सोहळा भक्तीभावाने साजरा करावा, असे आवाहन श्री सोमनाथ मंदिर भक्त मंडळ, निपाणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.