निपाणी नगरी वृत्तसेवा (21)
अक्कोळ : श्री पार्श्वमती विद्यालय,अक्कोळ येथे दिनांक २१ जून रोजी जागतिक योग दिन तसेच शाळेचा ४१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी योग प्रात्यक्षिके सादर करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी यु. पी. पाटील यांनी योग शिकवून विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले.
यावेळी प्रशालेच्या कला शिक्षिका सौ. व्ही. डी. इंदलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, परम पूज्य गुरुदेव १०८ श्री समंतभद्र महाराज यांच्या आशीर्वादाने दिनांक २१ जून १९८५ रोजी विद्यालयाची स्थापना झाली असून गेल्या ४१ वर्षांत अनेक विद्यार्थिनींनी येथे शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
तसेच विद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेक विद्यार्थिनींनी वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, शिक्षण, प्रशासकीय तसेच इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. विद्यार्थ्यांनी स्वावलंबी, शिस्तबद्ध व मूल्याधारित जीवन जगावे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत योगासने सादर केली. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षलागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यालयातील शिक्षकवृंद टी. ए. घोसरवाडे, पी. बी. कळंत्रे, एस. डी. खोत, डी. ए. देसाई, एस. बी. मगदूम, इतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन विद्यालय प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आले.जागतिक योग दिन व शाळेचा ४१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी मेहनत घेतल्याचे दिसून आले.