निपाणी नगरी वृत्तसेवा (30) कोडणी
अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल, कोडणी येथे गुरुपौर्णिमे निमित्त विद्यार्थ्यांनी अनोख्या आणि भावस्पर्शी पद्धतीने गुरुपूजनाचा कार्यक्रम साजरा केला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या पावलांचे ठसे रुमालावर घेऊन त्यांची पूजा केली.
भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र, मुलाच्या जीवनातील पहिले गुरु म्हणजे आई-वडील ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याच्या उद्देशाने शाळेने हा विशेष उपक्रम आयोजित केला. आई-वडील मुलाला जन्म देण्याबरोबरच त्याला संस्कार, शिस्त, प्रेम, मूल्ये आणि जीवन जगण्याची दिशा देतात. त्यामुळे त्यांच्या चरण चिन्हांचे पूजन करून विद्यार्थ्यांनी आपल्या पालकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या पावलांचे ठसे रुमालावर घेतले आणि त्यांचे पूजन करून “आई-वडील हेच आमचे पहिले गुरु” हा संदेश दिला. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पालकाप्रती आदर, कृतज्ञता आणि संस्कारांची भावना अधिक दृढ झाली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी गुरूंचे महत्त्व, आई-वडिलांचे योगदान आणि जीवनात मिळणाऱ्या संस्कारांचे महत्त्व याविषयी मनोगते व्यक्त केली. संपूर्ण वातावरण भावनिक आणि संस्कारमय झाले होते.
अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलच्या या उपक्रमातून शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.