निपाणी नगरी वृत्तसेवा (29)
मराठा मंडळ बेळगाव संचलित मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज ‘गुरुपौर्णिमा’ उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता आठवीच्या मुलींनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका व इतर मान्यवरांच्या हस्ते महर्षी व्यास ऋषींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा आदरपूर्वक सत्कार केला. विद्यार्थी प्रतिनिधी प्रांजळ जिनगे व लोकेश मुगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा घाटगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात गुरूंचे स्थान आणि मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचे मार्गदर्शन लाभले.