निपाणी नगरी वृत्तसेवा (1)
कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर, कर्नाटक राज्य संयुक्त सहकारी नियमित बंगळुरू मधील नामवंत व बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित, निपाणी या संस्थेच्या वतीने गुरुवारी (दि. ३०/०७/२०२६) दुपारी ४.०० वाजता गुरुपौर्णिमेनिमित्त श्री महात्मा बसवेश्वर सभागृहामध्ये ‘गुरुवंदना’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला असिस्टंट सीईओ सुजाता जाधव यांनी बसववचन सादर केले. त्यानंतर संस्थापक चेअरमन डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तर मिथुन अंकली यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी भक्ती योगाश्रम मठ हंचीनाळचे प्रमुख पाहुणे श्री ईश्वर उर्फ महेशानंद महास्वामीजी, श्री विरुपाक्ष लिंग देवस्थान समाधी मठाचे प्राणलिंग महास्वामीजी, पुराणिक मठ, मारुती कुन्नुरे, संचालक दिनेश पाटील, अशोक लिगाडे आणि विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी दीपप्रज्वलन करून वृक्षाला जल अर्पण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच उपस्थित मान्यवर, महास्वामीजी, संस्थापक चेअरमन डॉ. सी. बी. कुरबेट्टी, संचालक, नागरिक, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे स्वागत असिस्टंट सीईओ महादेव बडगीर यांनी केले. याप्रसंगी संस्थेतर्फे प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. श्री निकेतन मराठी व कन्नड कॉन्व्हेंट स्कूल, शांतिनिकेतन मराठी स्कूल आणि व्ही. एस. एम. मराठी व कन्नड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगणारी उत्कृष्ट भाषणे केली. या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने श्री महात्मा बसवेश्वर स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना ईश्वर उर्फ महेशानंद महास्वामीजी म्हणाले की, गुरुपौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्याने व्यासपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आपल्या जीवनात प्रथम आई-वडील हेच गुरु असतात, कारण ते आपले पालनपोषण करून जगण्याची दिशा देतात. त्यानंतर शालेय जीवनातील शिक्षक संस्कार करून आपले जीवन प्रकाशमय करतात. गुरु सर्वव्यापी व सर्व क्षमता असणारे असतात आणि त्यांच्या मार्गदर्शना शिवाय माणसाला अंतर्ज्ञान, स्वतःची ओळख व शांती मिळत नाही. प्रत्येकाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रती श्रद्धा ठेवून आपले जीवन सार्थक करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे सीईओ एस. के. आदन्नावर, असिस्टंट सीईओ महेश शेट्टी, भद्रेश फुटाणे, विद्या कमते, चंद्रकांत हंबर, सुरज घोडके यांसह सर्व शाखांचे कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता जाधव व राजेंद्र मगदूम यांनी केले, तर कर्मचारी पूजा इंगळे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.