निपाणी नगरी वृत्तसेवा (29)
श्री महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्रीनिकेतन कन्नड मराठी माध्यम शाळा, श्रीनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल तसेच शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेमध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भावपूर्ण प्रार्थना गीताने झाली, तर आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत मधुर स्वागत गीताने करण्यात आले. यानंतर उपस्थितांच्या हस्ते आद्यगुरू महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्यात नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून गुरूंप्रती अत्यंत आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. स्मिता नारे व समिना पठाण यांनी आपल्या मनोगतातून मानवी जीवनामध्ये गुरूचे स्थान व महत्त्व किती अनन्यसाधारण असते, हा विचार विद्यार्थ्यांसमोर मांडला. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. अलका भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत आणि व्यक्तिमत्त्व विकासात गुरूंचे अनमोल मार्गदर्शन कसे मोलाचे ठरते, याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन श्री. मिलिंद चौगुले, हायस्कूलचे चेअरमन श्री. कपूरचंद इंगळे, संस्थापक अध्यक्ष सी. बी. कुरबेट्टी, संचालक डॉ. अनिल ससे, श्री. प्रदीप पाटील, मुख्याध्यापिका सौ. ए. बी. भोसले यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन कुमारी अश्विनी हांडे हिने केले, तर शेवटी कुमार दर्शन हांडे याने उपस्थितांचे आभार मानले