निपाणी नगरी वृत्तसेवा (12)
निपाणी शहरातील मध्यवर्ती कित्तूर राणी चन्नम्मा चौक परिसरात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सराफ व्यावसायिकाला मोठा आर्थिक फटका दिला आहे. विलास गणपतराव माळी यांच्या मालकीच्या ‘श्री ज्वेलर्स’ या दुकानाचे शटर गॅस कटरने कापून अंदाजे ३१ लाख रुपये किमतीचे १२.५ किलो चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना सोमवारी पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार,चार चोरटे लाल रंगाच्या कारमधून घटनास्थळी आले. त्यांनी दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेरा निकामी करून शटरचे कुलूप व कडी गॅस कटरने कापली. त्यानंतर दुकानातील चांदीचे दागिने पोत्यात भरून कारमधून पलायन केले. सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात नागरिकांची गर्दी झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला असून, डीवायएसपी गोपाळकृष्ण गौडर यांच्या सह मंडळ पोलीस निरीक्षक बी एस तलवार, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गंगाप्पा पुजेरी यांच्यासह अनेक लोकांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरातील इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यामध्ये संशयित कार व चार चोरटे दिसत असल्याची माहिती आहे. या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, कित्तूर राणी चन्नम्मा चौकातील पालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिसरातील पथदिवे आणि सुरक्षा व्यवस्थेच्या स्थिती बाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. सणासुदीच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या चोरीमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
🔷 मुख्य मुद्दा :
शहराच्या मध्यवर्ती भागात ३१ लाखांची चोरी; बंद सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!
━━━━━━━━━━━━━━━━━━