पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार!
संजय मुरलीधर जाधव (वय 46, रा. बुदिहाळ) असे मृताचे नाव आहे!

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार. ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री आठच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शाहूनगर येथील वळणावर घडली. संजय मुरलीधर जाधव (वय 46, रा. बुदिहाळ) असे मृताचे नाव असे ते व्यवसायाने ट्रकचालक होते.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मयत जाधव निपाणीतील आपले काम आटोपून मूळ गावी दुचाकीवरुन चालले होते. शाहूनगर वळणावर आले असता महामार्गावरुन कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना मागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की जाधव दुचाकीवरुन कोसळल्या नंतर वाहनाने त्यांना जवळपास 50 ते 60 मीटर फरफटत नेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच मंडळ पोलिस निरीक्षक बी. एस. तळवार, उपनिरीक्षक उमादेवी गौडा यांच्यासह अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. उत्तरीय तपासणीनंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत जाधव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. शहर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध चालविला आहे.