ताज्या घडामोडी

कर्जदार व दुसरा जामीनदार सोडून एकाच जामीनदाराकडून पूर्ण कर्जवसुली ?

विशाल जुन्नर पतपेढीच्या अजब कारभारामुळे जामीनदारावर उपासमारीची वेळ

आवाज न्युज:  कर्जाचे हप्ते कर्जदाराऐवजी एकाच जामीनदाराकडून पतपेढी वसूल करीत असल्याने जामीनदाराच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. कर्जदार व दुसरा जामीनदार यांनी कर्जासाठी शेतजमीन तारण ठेवली असताना नोकरी करणा-या जामिनदाराकडून पतपेढी पूर्ण कर्ज का वसूल करत आहे, असा सवाल या जामिनदाराने उपस्थित केला आहे. पतपेढी, कर्जदार आणि दुसरा जामीनदार यांच्या संगनमताने ही लुबाडणूक सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बाळू राजू शिंदे (रा. घोणशेत, सध्या रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे या जामीनदाराचे नाव आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातही त्यांनी यासंदर्भात तक्रारअर्ज दिला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. मनमानी पद्धतीने कर्जवसुली करणाऱ्या संबंधित पतपेढीवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी सहकारमंत्र्यांकडे केली आहे.

बाळू शिंदे यांचे काका भिवा शंकर शिंदे व मावसभाऊ प्रकाश भिवा शिंदे यांना शेती व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी विशाल जुन्नर सहकारी पतपेढीच्या राजगुरुनगर शाखेकडे कर्जासाठी अर्ज केला.

भिवा व प्रकाश शिंदे यांनी कर्जासाठी शेतजमीन तारण ठेवली असल्याचे बाळू शिंदे यांना सांगितले तसेच, चंद्रकांत शिवाजी शेलार हे एक जामीनदार आहेत आणि दुसरे जामीनदार नोकरी करणारा व पेमेंट स्लिप असणारा आवश्यक आहे. त्यामुळे तू जामीनदार व्हावे, अशी विनंती त्यांनी केली.

नातेवाईक असल्याने बाळू शिंदे यांनी तात्काळ जामीनदार होण्यास होकार दिला व सर्व कागदपत्रे जमा केली. सात जानेवारी 2016 रोजी विशाल पतपेढीने भिवा व प्रकाश शिंदे यांना साडे तीन लाख रुपये कर्ज मंजूर केले.

पुढे कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बाळू शिंदे यांना पतसंस्थेकडून कर्ज भरण्यासाठी पगार कपातीचे पत्र प्राप्त झाले. त्यानुसार ऑक्टोबर 2019 पासून दरमहा 5,540 रुपये प्रमाणे हप्ता कपात व्हायला सुरुवात झाली. मे 2021 पर्यंत बाळू शिंदे यांच्या खात्यातून वीस हप्त्यांचे 1 लाख 10 हजार 800 एवढी रक्कम कपात झाली आहे.

‘कर्जदार व दुसऱ्या जामीनदाराने कर्जासाठी शेतजमीन तारण म्हणून ठेवली आहे. जमिनीचा लिलाव करून कर्जवसुली करण्याचा पर्याय पतसंस्थेकडे असताना पतपेढी फक्त माझ्या पगारातून कर्ज वसूली का करत आहे, असा सवाल बाळू शिंदे यांनी निवेदनात उपस्थित केला आहे.

कर्जदार व दुसरा जामीनदार निष्काळजीपणे फिरत आहेत, पतपेढी व्यवस्थापक, वसुली अधिकारी तसेच पतसंस्था संचालकांच्या वारंवार ही गोष्ट निदर्शनास आणून देखील ते दुर्लक्ष करतात. अकरा हजार रुपये पगारातील पन्नास टक्के पगार हप्त्यात जातो. उरलेल्या पन्नास टक्के पगारात घर कसं चालवायचे,’ असा उद्विग्न सवाल शिंदे यांनी निवेदनात उपस्थित केला आहे.

‘सदर प्रकरण पोलिसांना कळवू नये म्हणून कर्जदार दमदाटी करतात. त्यामुळे माझ्यासोबत काही अपघात अथवा घातपात झाला तर, काका भिवा शंकर शिंदे, मावसभाऊ प्रकाश भिवा शिंदे, चंद्रकांत शिवाजी शेलार व विशाल जुन्नर सहकारी पतपेढी यांच्या सर्व संचालक मंडळाला जबाबदार धरावे. तसेच, याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी,’ अशी मागणी बाळू शिंदे यांनी निवेदनाद्वारे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!