अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारली समाज जागृत करणारी वैशिष्ट्यपूर्ण रॅली!

निपाणी नगरी प्रतिनिधी (25)
आज दिनांक 25 एप्रिल 2025, शुक्रवार रोजी अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल ,कोडणी-निपाणी येथील विद्यार्थ्यांनी समाजामध्ये पर्यावरण व झाडांचे महत्त्व वाढविण्यासाठी रॅलीचे आयोजन केले होते.
रॅलीची सुरुवात निपाणी नगरपालिकेपासून करण्यात आली. यावेळी निपाणी नगरपालिकेचे चीफ अकाउंट श्री नरेंद्र बहादुर व श्री कुरणे यांनी आपली उपस्थिती दर्शवून मुलांना प्रोत्साहन दिले. तसेच पर्यावरण व झाडांचे महत्त्व पटवून दिले. शिवाय लहान मुलांनी समाज जागृतीसाठी उचललेल्या या पावलाचे विशेष कौतुकही केले.
निपाणी नगरपालिकेपासून सुरु झालेली ही रॅली चाटे मार्केट ,नेहरू चौक ,दलाल पेठ, कोठेवाले कॉर्नर ,अशोक नगर व चन्नम्मा सर्कल या मार्गे फिरत आली. रॅली दरम्यान मुलांनी विविध घोषणा देत आजूबाजूचा परिसर दणाणून सोडला. सेव्ह फॉरेस्ट, सेव्ह लाइफ, झाडे लावा पर्यावरण वाचवा, पेड बचाओ, देश बचाओ अशा विविध घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या.
या रॅलीची सांगता चन्नम्मा सर्कल इथे करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ चेतना चौगुले यांनी विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व पटवून दिले .तसेच आजच्या वाढत्या तापमानात वृक्षतोड व निसर्गाची हानी हे जबाबदार असून आपणच निसर्गाची काळजी घेतली पाहिजे व त्यासाठी योग्य ती पावले उचलली पाहिजेत असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी शाळेचा विद्यार्थी विहांग जाधव याने देखील आपले मनोगत व्यक्त करताना नुकतीच घडलेली हैदराबाद येथील वृक्षतोड व प्राण्यांची झालेली जीवितहानी याचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित केले.
या रॅलीच्या वेळी पोलीस निरीक्षक श्री अरबळी व श्री कडगावे यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले .या रॅलीच्या वेळी पोलीस सहकाऱ्यांसोबतच शाळेच्या प्राचार्या सौ चेतना चौगुले यांच्या समवेत साधारण अडीचशे विद्यार्थी व संपूर्ण शिक्षक वृंद उपस्थित होता. शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे शहरातील नागरिकांकडून व पालकांकडून विशेष कौतुक होत आहे.
या मोहिमेला अनुसरूनच शाळेच्या पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले असून त्यांची निगा राखण्याची जबाबदारी देखील या विद्यार्थ्यांनी उचललेली आहे.