निपाणी नगरी वृत्तसेवा (24)
निपाणी शहरात सध्या क्रिकेटचा उत्साह शिगेला पोहोचला असून कै. डी. व्ही. पाटील स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. हिंदवी स्पोर्ट्स क्लब आणि निकु पाटील मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत परिसरातील तब्बल 35 संघ सहभागी झाले आहेत.
एम. डी. विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या उद्घाटन सोहळ्यात माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना, “खेळ हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून तो युवकांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि नेतृत्वगुण निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे,” असे सांगितले. ग्रामीण भागातील तरुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी, या उद्देशातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी नमूद केले.
उद्घाटनानंतर लगेचच सामन्यांना सुरुवात झाली. पहिल्याच दिवसापासून मैदानावर चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रेक्षकांनीही मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला.
स्पर्धेदरम्यान हिंदवी स्पोर्ट्स चे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. आयोजकांनी सर्व संघांचे स्वागत करत खेळाडूंना खेळभावना जपण्याचे आवाहन केले. स्पर्धा पुढील काही दिवस सुरू राहणार असून विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात येणार आहे.