निपाणी नगरी वृत्तसेवा (22)
कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्रि मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने संकुलात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील होते . तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील , प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील हे उपस्थित होते. प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक श्रीनाथ सावंत यांनी केले. नंतर उपस्थित मान्यवरांच्या अमृत हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर अजित पाटील यांनी योग दिनाची माहिती देऊन त्याचे महत्त्व विशद केले.
यानंतर प्राचार्य अनमोल पाटील यांनी मनोगतात योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योग म्हणजे केवळ व्यायाम नसून शरीर , मन आणि आत्मा यांचा सुंदर समतोल साधणारी जीवन पद्धती असल्याचे सांगितले. नंतर संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील यांनी योग आपल्याला शिस्त, संयम आणि सकारात्मक विचारांची शिकवण देतो असे सांगितले. संस्थेचे सचिव कुमार पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव वाढत आहेत अशावेळी योग आपल्याला शांतता, संयम आणि आनंद देतो. प्राणायाम , ध्यान आणि विविध योगासने यांचा नियमित सराव केल्यास आपण निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतो असे सकारात्मक विचार त्यांनी मांडले.
यानंतर प्रतिक्षा काटवाळे यांनी अनेक योगासनाचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे महत्त्व स्पष्ट केले . यावेळी संकुलातील विद्यार्थ्यांनी त्या प्रात्यक्षिकाचे उत्तम सादरीकरण केले . यावेळी संकुलातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार पवार यांनी केले तर आभार स्नेहल कांबळे यांनी मानले.