निपाणी नगरी वृत्तसेवा श्रीपेवाडी, (29)
भारतीय संस्कृतीत “मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव” या मूल्यांची जोपासना करण्याचा संदेश देणारा गुरुवंदना व पालक पाद्य पूजन सोहळा श्री. जी. एम. संकपाळ हायस्कूल व प्राथमिक शाळा, श्रीपेवाडी आणि जायंट्स ग्रुप, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त अत्यंत भक्तिमय व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक मा. श्री. गजाननराव शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्याख्याते, प्रवचनकार व कीर्तनकार डॉ. प्रकाश कदम, ज्योतिषशास्त्रज्ञ दयानंद स्वामी महाराज, जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष प्रभाकर नाईक, प्रकाश वरणे, अभिजीत मगदूम (भिवशी) तसेच प्रज्वल स्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
दीपप्रज्वलन, व्यास पूजन आणि गुरु वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे व गुरुजनांचे पारंपरिक पद्धतीने पाद्य पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी सभागृहातील वातावरण भावनांनी भारावून गेले. अनेक पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील गुरु पालका विषयीचा आदर प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त केला.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनात गुरूंचे जीवनातील स्थान, पालकांचा सन्मान, नैतिक मूल्ये, संस्कार, शिस्त आणि चारित्र्य यांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक बनण्याचे प्रेरणादायी आवाहन केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे. एस. जाधव (हायस्कूल विभाग) आणि श्री. एस. डी. पोवार (प्राथमिक विभाग) यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय श्री. एस. डी. पोवार यांनी केला. पाद्य पूजन विधी दयानंद स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सी.एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना संस्कार प्रतिज्ञा दिली.
कार्यक्रमाचे प्रभावी, ओघवते आणि रसाळ सूत्रसंचालन श्री. बी. एच. पाटील यांनी केले, तर श्री. एस. आर. मगदूम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्कार, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेचे दर्शन घडविणारा हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.