निपाणी नगरी वृत्तसेवा (30)
कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्री मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी या संकुलात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील हे होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील, प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील हे उपस्थित होते. प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वर्षा कुलकर्णी यांनी केले. नंतर मान्यवरांच्या अमृत हस्ते व्यास पूजन व दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार करून शाळेतील सर्व शिक्षकांना पुष्प देऊन गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नंतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. आरती कारागीर व नितीन पाटील या शिक्षकांनी गुरु पौर्णिमेचे महत्त्व विशद केले.
मुख्याध्यापिका कोमल पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना गुरुपौर्णिमा हा केवळ पूजनाचा दिवस नसून गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचे स्मरण करून ते आचरणात आणण्याचा व संकल्प करण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, शिस्त, परिश्रम आणि सदाचार या गुणांचा अंगीकार करून आदर्श नागरिक बनावे असा मनोगतातून शुभाशीर्वाद दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमार पाटील यांनी मनोगतामध्ये गुरु हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे दीपस्तंभ आहेत. ज्ञान, संस्कार, शिस्त आणि राष्ट्रप्रेम यांची शिकवण देणारे गुरुच विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतात. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गुरूंचा आदर करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवनात यश संपादन करावे अशी शुभेच्छा व्यक्त केली. यावेळी अभिजीत गुडस्कर, सतीश कुंभार, सचिन पाटील ,शुभम निल्ले, सारंग नलवडे, तुषार पवार, ओमकार गुरव, अंकुश खोत, महंमद गवंडी यांच्यासह संकुलातील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता दिवटे यांनी केले तर आभार प्रतीक्षा काटवाळे यांनी मानले.