निपाणी नगरी वृत्तसेवा (1)
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी औद्योगिक वसाहत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून, संस्थेला ‘अ’ दर्जाचे मानांकन प्राप्त झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा सेलडीडचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. आत्तापर्यंत 55 पेक्षा अधिक लोकांनी सिलडिड प्रत्यक्षात करून घेतले असून, त्यांना स्टॅम्प ड्युटीचा देखील भार न पाडता, प्रत्यक्ष खरेदी करून दिल्या आहेत. औद्योगिक वसाहतीच्या हद्दवाढी संदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे, हा प्रश्न निकालात काढण्यासाठी निपाणी शहरास न जोडता स्वतंत्रपणे पूर्वीच्या कार्यक्षेत्रात राहावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे, हा प्रश्न निकालात काढण्यासाठी कायमस्वरूपी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन संस्थेचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब जोरापुरे यांनी केले.
निपाणी औद्योगिक वसाहत संस्थेच्या ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर ते बोलत होते. प्रारंभी संस्थेचे संचालक सुधाकर थोरात, सुशांत भिसे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या आणि औद्योगिक वसाहतीच्या प्रगतीचा सकारात्मक आढावा घेत सभासदांचा विश्वास संपादन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
चेअरमन बाळासाहेब जोरापुरे पुढे म्हणाले, परिसरामध्ये अनेक चोरीच्या घटना घडल्यामुळे आम्ही लवकरच बीट पोलिसांची नेमणूक करणार असून, संस्थेची इमारत देखील पूर्णत्वाच्या मार्गावर असून नवीन वास्तुत देखील लवकरच स्थलांतर करू, सध्या औद्योगिक वसाहत परिसरात वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे कारखानदार अडचणीत येत आहेत. हे लक्षात घेऊन आमदारांची भेट घेऊन थेट औद्योगिक वसाहती पर्यंत वीज पुरवठा करावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. औद्योगिक वसाहती पर्यंत वेदगंगा नदीवरून पाण्याच्या पाइपलाइनसाठी आमदार फंडातून निधी उपलब्ध करण्यात येणार आहे, असे सांगितले.
अहवाल वाचनात संस्थेचे कर्तव्यदक्ष सेक्रेटरी बाळकृष्ण मगदूम म्हणाले, संस्थेचे ७२९ सभासद असून या आर्थिक वर्षामध्ये तीन सभासद नवीन केले आहेत. भाग भांडवल ३.६१ लाख, ४.६५ लाख राखीव निधी, तर १ कोटीच्या ठेवी आहेत. आर्थिक वर्षात संस्थेला १५.४४ लाख इतके उत्पन्न झाले असून ९.९९ लाख इतका खर्च झाला. यात ५.४५ लाखाचा आर्थिक वर्षात नफा झाला आहे असे सांगितले.
यावेळी संस्थेचे संचालक शशिकांत सासणे, जनार्दन भाटले, गुरुनाथ पाटील, गितन शहा, आनंदा सुरवशे, सचिन जाधव, मलगोडा पाटील, समित सासणे, प्रकाश शिंदे, रमेश भिवसे, सुशील पाटील, सुयोग मेहता, रमेश भारमल, विजय पाटील, किरण पाटील, प्रशांत पाटील, ऋतुराज शितोळे, प्रवीण खवरे, सुनील उमराणे, किशोर हरदारे, रवींद्र सासने, सागर पाटील, दीपक माने, रमेश वैद्य आदी उपस्थित होते. व्हाईस चेअरमन धोंडीराम कणसे यांनी आभार मानले.
चेअरमन बदला नाहीतर तर समस्या सोडवा…
दरम्यान, निपाणी औद्योगिक वसाहत सभासदांना अनेक समस्या भेडसावत असताना संस्था चेअरमन बाळासाहेब जोरापुरे विशेष लक्ष देताना दिसत नाहीत. कोणत्याही समस्येसाठी त्यांच्याकडे गेल्यानंतर नेहमी उडवा उडविची उत्तरे दिली जातात, येथे पिण्याच्या पाण्याची व खंडित वीज पुरवठ्याची समस्या गंभीर आहे. हद्दवाढ आणि सेलडीड प्रक्रिया आणखी सुलभ करावी, चालू हंगामात समस्या निकालात काढायला जमल्या नाहीत तर अध्यक्षांनी राजीनामा द्यावा व संचालक मंडळाने नव्या अध्यक्षांना निवडून समस्या निकालात काढण्यासाठी गती द्यावी, अशी मागणी औद्योगिक वसाहतीचे माजी संचालक अण्णासाहेब वरुटे यांनी प्रत्यक्ष व्यासपीठावर केली. माजी संचालक रमेश भिवसे, ज्येष्ठ सभासद इरान्ना स्वामी, स्वप्निल कमते, सुनील पाटील, यांनी देखील वसाहती संदर्भातील प्रश्न गांभीर्याने मांडले. व अध्यक्षांना निर्वाणीचा इशारा देत चेअरमन बदला नाही तर समस्या सोडवा असा इशारा दिला.