निपाणी नगरी वृत्तसेवा (10)
कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्रि मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी या संकुलात ऑगस्ट क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील या होत्या. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे सचिव कुमार पाटील, प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील हे उपस्थित होते. प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक आर्यन बेलवळे या विद्यार्थ्यांने केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यार्थी मनोगतामध्ये ओम बागडे, श्रेयश मर्दाने, प्रथमेश पाटील यांनी क्रांती दिनाची माहिती सांगितली. शिक्षक मनोगतामध्ये नितीन पाटील यांनी क्रांती दिनाचा इतिहास व त्याची पार्श्वभूमी स्पष्ट केली.
मुख्याध्यापिका कोमल पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, आपल्या हातात पुस्तके आहेत, आपल्या मुलांच्या हातात शिक्षणाची संधी आहे, आपल्या विचारांना स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही. त्यामागे असंख्य देशभक्तांचे त्याग आणि बलिदान आहे म्हणूनच आजचा दिवस केवळ इतिहास आठवण्याचा दिवस नाही तर त्या इतिहासातून वर्तमानाची दिशा आणि भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा दिवस असल्याचे सांगितले.
अध्यक्षा रेखा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले आता ते स्वातंत्र्य सुरक्षित, समृद्ध आणि सुसंस्कृत ठेवण्याची जबाबदारी आपली असून अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद , चुकीच्या विचारांना बदलण्याचे ध्येय आणि चांगल्या भविष्याची निर्मिती करण्याची जिद्द आज आपण मनात पेरली पाहिजे अशी प्रेरणा त्यांनी मनोगतातून दिली. यावेळी संकुलातील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पृथ्वीराज सूर्यवंशी या विद्यार्थ्याने केले तर आभार वैभव पाटील या विद्यार्थ्यांने मानले .