निपाणी नगरी वृत्तसेवा (25)
आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत माणूस कामाच्या व्यापामध्ये इतका व्यस्त झाला आहे की, बालपणीचा तो निखळ आनंद आणि निष्पाप दिवस कुठेतरी मागे राहून गेले आहेत. अशा या धकाधकीच्या आयुष्यात क्षणभर थांबून भूतकाळातील सुंदर पानांवर पुन्हा एकदा प्रेमाचा हात फिरवण्यासाठी विद्या मंदिर, निपाणी येथील दहावीच्या (१९९०-९१ बॅच) माजी विद्यार्थ्यांच्या वतीने एका अतिशय भावूक आणि आनंददायी ‘स्नेह मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा रविवार, दिनांक २५ ऑक्टोबरला ‘श्री गुरुदत्त मंगल कार्यालय, गवाणी येथे पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व गुरुजनांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलनाने करण्यात आली. सर्व शिक्षकांनी आपल्या मनोगता मध्ये सत्यनिष्ठा, सकारात्मक विचार, व आपली ध्येय धोरणे ठरविण्या संदर्भात अनमोल विचार मांडत कार्यक्रमाच्या नियोजनाची स्तुती केली.
सुमारे ३५ वर्षांपूर्वी शाळेच्या आवारात एकत्र घालवलेले ते सोनेरी दिवस, वर्गमित्रांच्या गमतीजमती, एकत्र खाल्लेला डबा आणि शिक्षकांचे ते मोलाचे मार्गदर्शन या सर्व आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत. आपण पाहिलेले ते साधे, सुंदर आणि दंगा-मस्तीने भरलेले बालपण आणि आजच्या डिजिटल युगातील व्यस्त दिनचर्या यातील अंतर मिटवण्यासाठी हा स्नेहमेळावा एक उत्तम व्यासपीठ ठरल्याचे शिक्षकांनी पुढे नमूद केले.
विशेष म्हणजे, या वर्गातील सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी आज आयुष्याच्या ५०व्या टप्प्यावर (पन्नाशीत) पदार्पण करत असताना एकत्र आले होते. आयुष्याच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर बालपणीच्या जुन्या मित्रांना, मैत्रिणींना पुन्हा भेटणे आणि त्या रेशीमबंधांना उजाळा देणे ही प्रत्येकासाठीच एक अनमोल पर्वणी ठरली.
दरम्यान, सकाळी सर्व येणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन व गुरुजनांच्या अंगावर पुष्पवृष्टी करून त्यांचे मनोहरी स्वागत करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगता द्वारे अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रम हालके फुलका केला. 35 वर्षानंतर आपल्या वर्गातील मित्रांना भेटल्यानंतर मैत्रिणीच्या डोळ्यात देखील अलगदपणे आनंदाश्रू तरळले.
या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे केवळ एकत्र येणे एवढेच नसून, या वयात एकमेकांना आधाराची, आपुलकीची आणि मैत्रीच्या उबदार स्पर्शाची जाणीव करून देणे हे आहे. जुन्या सहवासाने आणि गप्पागोष्टींनी हा दिवस अत्यंत आनंददायी व अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमास एम ए नाईक सर, एम बी.जाधव सर, अनिल खांडके सर,पुरंदरे मॅडम, दिवानी मॅडम,पोतदार सर,सोलापूरे सर, आनंदा खराडे सर,मणियार सर,यांच्यासह वर्गमित्र-मित्र मैत्रिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.