निपाणी नगरी वृत्तसेवा (23)
शुक्रवार दि. २३.१०.२०२६ रोजी सकाळी ११.०५ वाजता या शुभ मुहूर्तावर श्रीनिवास श्रीमंत पाटील (मॅनेजिंग डायरेक्टर, अथणी शुगर्स लि.) यांच्या शुभहस्ते गव्हाणीत ऊस मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी विधीवत गव्हाण पूजन करण्यात आले.
सध्याची दुष्काळी परिस्थिती, वाढता ऊस उत्पादन खर्च यामुळे यंदाचा गळीत हंगाम आव्हानात्मक ठरणार आहे. मात्र, या संकटावर मात करून अथणी शुगर्स लि. भुदरगड युनिट शेजारील कारखान्याप्रमाणे ऊसदराची परंपरा यंदाही कायम ठेवेल. साखरेचे दर वाढल्यास त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणेस प्रयत्नशील राहू, तसेच चालू हंगामात 3.5 लाख क्रशिंग करू अशी ग्वाही कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. श्रीनिवास श्रीमंत पाटील यांनी दिली. कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या अकराव्या गळीत हंगामाच्या मोळी पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
श्रीनिवास पाटील म्हणाले, यंदा पावसाचे प्रमाण कमी व अवेळी राहिल्याने राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. पाणीपातळीत घट झाली आहे. गेल्या पंचवीस ते तीस दिवसांत पावसाने ओढ दिल्याने विशेषतः माळरानावरील ऊस पिके वाळू लागली आहेत. याचा परिणाम उसाची वाढ, वजन आणि साखर उताऱ्यावर होण्याची शक्यता आहे. खते, औषधे, मजुरी आणि अन्य निविष्ठांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व कारखानदारीच्या आर्थिक गणितावर परिणाम होत आहे.
ते म्हणाले, कारखान्याचे कामगार अत्यंत कष्टाळू, मेहनती आणि प्रामाणिक असून संकटाच्या काळात झोकून देऊन काम करण्याची त्यांची परंपरा आहे.त्यामुळे कामगारांच्या बाबतीत कारखान्याने नेहमी समाधानकारक भूमिका घेतली आहे. तसेच ऊसतोडणी कामगारांनीही दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संप न करण्याचा निर्णय घेतला आहॆ.
यावेळी चीफ इंजिनिअर श्री. नामदेव पुंडलिक भोसले, , चीफ केमिस्ट श्री. प्रकाश बापुसो हेंदुरे, चीफ अकाऊंटंट श्री. जमीर इरशाद मकानदार, यांच्यासह कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक शेती अधिकारी श्री. राजाराम शामराव आमते यांनी केले व आभार व स्वागत कार्यालय अधीक्षक श्री. बाबासाहेब गणपती देसाई यांनी मानले.