निपाणी नगरी वृत्तसेवा..(18)
आज दिनांक 18/ 1/ 2025, रविवार रोजी अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल, कोडणी -निपाणी, येथे शाळेमार्फत पतंगोत्सव आयोजित करण्यात आला होता .यामध्ये पालकांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन पतंग बनवून त्यावरती मुलांच्या इच्छा, आकांक्षा व भविष्यातील त्यांची उद्दिष्टे लिहून पतंग उडविण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे सेक्रेटरी डॉक्टर अमर चौगुले, प्राचार्य सौ चेतना चौगुले, व संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर उत्तम पाटील यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे उद्देश निरूपण होऊन प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आली. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर अमर चौगुले यांनी पालकांशी संवाद साधताना पालकांनी दिवसातून काही वेळ मुलांसोबत घालविणे हे अत्यंत गरजेचे असून त्यांना पौराणिक व जुन्या खेळांची माहिती होणे देखील तितकेच गरजेचे आहे. आणि यामध्ये पालकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पालकांनी व मुलांनी काही काळ एकत्र घालवावा व तो मनमोकळेपणाने साजरा करावा या उद्देशाने या पतंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद देत शाळेच्या सर्व पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सर्वांनी आनंदाने पतंगोत्सवात सहभागी होऊन नानाविध रंगांचे पतंग करून त्यांना आकाशात उडविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका सौ पौर्णिमा वंजारे यांनी केले तर सौ.ओसिया शाह यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले .कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या प्राचार्या सौ चेतना चौगुले, सेक्रेटरी डॉक्टर अमर चौगुले ,डॉक्टर उत्तम पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.