निपाणी नगरी वृत्तसेवा..(17)
मत्तीवडे तालुका हुक्केरी ग्रामपंचायती मध्ये प्रत्यक्षात कोणतेही काम न करता फक्त कागदोपत्री घोडे नाचवत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप त्याच पंचायतीस संलग्न असणाऱ्या नांगनूर (के.एस) येथील ग्रामस्थांनी केल्यामुळे कालची सामाजिक संशोधन ग्रामसभा सन 2024 – 25 अहवाल सभा वादळी झाली.
एकूण सदस्य संख्या 10 असणाऱ्या मत्तीवडे, भैरापूर, नांगनुर (के.एस) या ग्रुप ग्रामपंचायतीत कोणतेही काम प्रत्यक्षात न करता लाखो रुपयाची बिले काढून भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप काल नांगनूर तालुका हुक्केरी येथील ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना केला.
ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी सामाजिक संशोधन ग्रामसभा सन 2024-25 आयोजित करण्यात आलेली होती. या सभेमध्ये नांगनूर येथील ग्रामस्थांनी एकूण 18 कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकृत मानल्या जाणाऱ्या कागदपत्रांच्या स्थळ प्रति माध्यमांना दाखवल्या. त्यामुळे काही वेळ या सभेला ग्रामसभेचे स्वरूप प्राप्त झाले होते. आणखीन विशेष म्हणजे या कागद पत्रामध्ये अपलोड केलेले फोटो मात्र हास्यास्पद होते.
या विषयी ग्रामपंचायत अध्यक्ष दशरथ कुलकर्णी यांना ग्रामस्थांनी केलेल्या अरोपा संदर्भात विचारले असता ते म्हणाले ग्रामपंचायतीवर केलेले सर्व आरोप चुकीचे असून, कोणत्याही पद्धतीचा भ्रष्टाचार झालेला नाही, सर्व कामे पूर्ण झालेली असून संपूर्ण कारभार पारदर्शक आहे, झालेल्या कामांमध्ये काही गैर आढळल्यास किंवा कोणाचा हस्तक्षेप आहे असे वाटल्यास सर्व ग्रामस्थांच्या मागणीनुसार होणाऱ्या 22 जानेवारी रोजीच्या ग्रामसभेस सर्वाांनी उपस्थित राहावे व त्या सभेमध्ये वरील सर्व आरोपांची उत्तर दिली जातील असे सांगितले.
माजी अध्यक्ष प्रकाश पाटील म्हणाले, बऱ्याच दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी नसल्या कारणाने अनेक ग्रामसभा झालेल्या नाहीत. पण कार्यालयामध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही, शासनाने योग्य निधी दिल्यास आपली ग्राम पंचायत एक उत्तम पद्धतीचे मॉडेल म्हणून उभे राहणार असल्याचे सांगितले.
नांगणुरचे ग्रामस्थ सतीश कांबळे म्हणाले येणाऱ्या 22 जानेवारीला अध्यक्षांनी ग्रामसभा बोलावली आहे. व शक्यतो या सभेमध्ये कोणतेही विषयांतर न होता यामध्ये फक्त आणि फक्त आज उपस्थित केलेल्या 18 ते 19 कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचार आणि नागरिकांच्या शंकेचे निरसन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
नागेश पाटील म्हणाले कार्ययोजनेची कागदपत्रे पीडीओनी देणे गरजेचे असल्याचे सांगितले, अशोक पाटील यांनीही समस्या व्यक्त केल्या. यावेळी तालुका पंचायतीचे सी एम पाटील, नोडल ऑफिसर एम बी बंजत्री, पी.डी.ओ चंद्रशेखर मंटूर, ग्रामपंचायत अध्यक्ष दशरथ कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रांजली कांबळे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.