निपाणी नगरी वृत्तसेवा (29)
“निपाणी शहर व ग्रामीण परिसरात ३० जूनपासून ‘SIR’ (Special Intensive Revision – विशेष सखोल पुनरीक्षण) मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी फिरणार असून मतदार यादीत नाव नोंदणी आणि दुरुस्तीसाठी वयानुसार कागदपत्रांचे नवे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या या मोहिमेदरम्यान नागरिक सलग तीन वेळा घरात न आढळल्यास किंवा त्यांनी योग्य माहिती न दिल्यास त्यांचे नाव मतदार यादीतून थेट कापले जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी वेळीच सतर्क होणे गरजेचे आहे.”
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या या मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, दुबार किंवा मयत मतदारांची नावे वगळणे आणि नवीन पात्र मतदारांचा समावेश करणे हा आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत BLO (शिक्षक व कर्मचारी) प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार आणि अर्ज देणार आहेत. यानंतर ५ ऑगस्ट २०२६ रोजी कच्ची (प्रारूप) मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीत नाव नसणे किंवा काही दुरुस्ती असल्यास ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या मुदतीत नागरिकांना आपले दावे व हरकती दाखल करता येतील, तर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम आणि सुधारित मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या मोहिमेत नवीन मतदार नोंदणी किंवा दुरुस्तीसाठी वयाच्या गटानुसार योग्य कायदेशीर कागदपत्रे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार वर्ष २००२ च्या मतदार यादीत आधीपासून नाव असलेल्या नागरिकांना कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची गरज नसून, त्यांना केवळ ‘मॅपिंग फॉर्म’ भरून स्वाक्षरी द्यावी लागेल. १ जुलै १९८७ पूर्वी जन्मलेल्या व यादीत नाव नसलेल्या नागरिकांसाठी स्वतःचा जन्मदिनांक आणि जन्मस्थळाचा पुरावा असणारे कागदपत्र आवश्यक आहे. १ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ दरम्यान जन्मलेल्या नागरिकांना स्वतःच्या जन्माच्या पुराव्यासोबत आई किंवा वडिलांपैकी एकाच्या जन्माचा पुरावा जोडावा लागेल, तर २ डिसेंबर २००४ नंतर जन्मलेल्या नवीन मतदारांना स्वतःच्या पुराव्यासोबत आई आणि वडील या दोघांच्याही जन्माचा पुरावा देणे अनिवार्य आहे. या मोहिमेसाठी जन्म दाखला, पासपोर्ट, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र (Domicile), १० वी/१२ वीचे बोर्ड प्रमाणपत्र, कुटुंब नोंदवही उतारा, सरकारी जमीन/घराची कागदपत्रे, सरकारी ओळखपत्र, पेन्शन आदेश (Pension Order), वनहक्क प्रमाणपत्र किंवा १ जुलै १९८७ पूर्वीचे बँक वा पोस्टाचे पासबुक ही ११ कायदेशीर कागदपत्रे ग्राह्य धरली जातील. या मोहिमेअंतर्गत BLO तुमच्या घरी सलग तीन वेळा भेट देतील आणि तीनही वेळा संपर्क न झाल्यास दारावर नोटीस चिकटवली जाईल. त्यानंतरही नागरिकांनी प्रतिसाद न दिल्यास मतदार यादीतून नाव वगळण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यामुळे निपाणी शहर व शिरगुप्पी परिसरातील सर्व नागरिकांनी आपल्या प्रभागात येणाऱ्या शिक्षकांना सध्याचे ताजे फोटो आणि अचूक माहिती देऊन प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अशाच ताज्या आणि खात्रीशीर घडामोडींसाठी वाचत राहा ‘निपाणी नगरी’.