निपाणी नगरी वृत्तसेवा..(27)
“बायोमेट्रिक प्रणाली नाही, शिस्त नाही; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांची गैरसोय, प्रशासनावर प्रश्नचिन्ह या प्रकारामुळे कार्यालयीन शिस्तीचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन वेळेवर उपस्थिती बंधनकारक करावी”
निपाणी तालुका पंचायत कार्यालयात कर्मचारी वेळेवर उपस्थित न राहिल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ठरलेल्या कार्यालयीन वेळेत अनेक कर्मचारी अनुपस्थित असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत असून, “यांना विचारणारा कोणीच नाही का?” असा सवाल सामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागातून विविध कामांसाठी सकाळी लवकर येणाऱ्या नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे काही कर्मचारी प्रत्यक्षात ११:३० नंतर कार्यालयात दाखल होत असले तरी मस्टरवर मात्र १०:३० ची सही असल्याचे प्रकार समोर येत आहेत. बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली नसल्याचा फायदा घेत शिस्त मोडली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
विविध शासकीय योजना, दाखले व प्रशासकीय कामे यासाठी नागरिक तालुका पंचायत कार्यालयात येतात. मात्र कर्मचाऱ्यांच्या उशिरा येण्यामुळे कामकाज खोळंबत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही होत आहे.
या प्रकारामुळे कार्यालयीन शिस्तीचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन वेळेवर उपस्थिती बंधनकारक करावी व कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.