निपाणी नगरी वृत्तसेवा..(1)
तांबाळे (ता. भुदरगड) अथणी शुगर्सच्या भुदरगड युनिटकडून गळीत हंगाम 2025-26 मध्ये गाळपासाठी आलेल्या एकूण 2,48,319 मे. टन ऊसाचे संपूर्ण बिल संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. श्रीनिवास पाटील यांनी एका बैठकीदरम्यान दिली.
शेतकरी वर्गाची मागणी लक्षात घेऊन ऊस बिलाची रक्कम नियोजित मुदतीपूर्वीच, म्हणजेच 31 मार्चपूर्वी सुमारे आठ दिवस आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपली कर्जे वेळेत फेडणे सुलभ होणार आहे. वेळेत ऊस बिल अदा करण्याची परंपरा अथणी शुगर्सने यंदाही कायम ठेवली आहे.
दरम्यान, पुढील गळीत हंगाम 2026-27 साठी ऊस तोडणी व वाहतूक करार संबंधित गट कार्यालयांमध्ये सुरू करण्यात आले आहेत. मजूर टंचाईचा विचार करून ऊस तोडणी यंत्राद्वारे ऊस पुरवठा वाढविण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याचे काम कारखान्याच्या इंजिनिअरिंग विभागाकडून युद्धपातळीवर सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. संबंधित ऊस वाहतूकदारांनी पुढील हंगामासाठी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहनही कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. श्रीनिवास पाटील यांनी या बैठकीदरम्यान केले.
यावेळी चिफ इंजिनियर नामदेव भोसले,चिफ केमिस्ट पी. बी. हेदुरे,शेती अधिकारी राजाराम आमते, कार्यालय अधीक्षक बाबासाहेब देसाई,चिफ अकाउंटट जमीर मकानदार, कन्हेया गोरे,शिवाजी खरुडे सतीश पाटील, संताजी देसाई, दिलीप गायकवाड, अमृत कळेकर, अजिंक्य केसरकर, मुराद काझी व ऊसउत्पादक, वहाणमालक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.