निपाणी नगरी वृत्तसेवा..(13)
कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्री मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने संकुलात शिक्षक पालक सभा उत्साहात संपन्न झाली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील हे होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील, प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील हे उपस्थित होते. प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शिवानंद ऐवाळे यांनी केले. नंतर मान्यवरांच्या अमृत हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका कोमल पाटील यांनी घर आणि शाळा हे विद्यार्थ्यांचे पहिले दोन शिक्षणाचे केंद्र आहेत . या दोन्ही ठिकाणचे संस्कार, मार्गदर्शन आणि प्रेम यांच्या आधारावरच मुलांचे व्यक्तिमत्व घडत असते हे सांगताना शाळा आणि पालक यांचे नाते हे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगितले. प्राचार्य अनमोल पाटील यांनी मनोगतात आपली शाळा ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सदैव प्रयत्नशील आहे. विविध उपक्रम, स्पर्धा , क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा आमचा प्रयत्न असतो असा विश्वास त्यांनी पालकांना दिला. सचिव कुमार पाटील यांनी मनोगतात पालकांनी आपल्या मुलांशी दररोज संवाद साधून त्यांच्या शालेय जीवनाबद्दल विचारपूस करावी आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे असे सांगितले.
यावेळी संकुलातील सर्व शिक्षक वृंद , विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिशेला दत्तवाडे यांनी केले तर आभार सरिता दिवटे यांनी मानले.