निपाणी नगरी वृत्तसेवा.(15)
“निधर्मी जनता दल चा २५वा रौप्यमहोत्सवी स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेत, समाजहिताचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून हा विशेष दिवस विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. “गेल्या २५ वर्षांत पक्षाने सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला आहे. रौप्यमहोत्सवी वर्ष सर्व कार्यकर्त्यांना नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारे ठरणार आहे.”
एकेकाळी कर्नाटक विधानसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या निजद पक्षाच्या 25 व्या स्थापनादिना निमित्त येत्या 27 फेब्रुवारी रोजी विजापूर येथे जनता समावेश असलेले निधर्मी जनता दलाचे रौप्यमहोत्सवी भव्य अधिवेशन होणार असल्याची माहिती जे.डी.एस जिल्हाध्यक्ष शंकर मुदलगी यांनी दिली. निपाणी येथील निपाणी तालुका अध्यक्ष प्रसन्नकुमार गुजर यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, देवेगौडा यांनी पंतप्रधान म्हणून तर कुमारस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि केंद्रीय मंत्री म्हणून या प्रादेशिक पक्षाचे नेतृत्व केले आहे. पक्ष संघटनेसाठी कित्तूर कर्नाटकातील 7 जिल्ह्यांचा दौरा करून विजापूर येथे भव्य रौप्यमहोत्सवी अधिवेशन आयोजित करण्याची तयारी कुमारस्वामी करत आहेत. त्यामुळे आमच्या सर्व नेत्यांनी बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदारसंघातील 20 हजारांहून अधिक लोकांना एकत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील काँग्रेस सरकार दिवाळखोरीत निघाले आहे आणि भ्रष्टाचारात गुंतले आहे. आम्ही या सरकारविरुद्ध जेडीएस पक्षाचे संघटन करू आणि ते पुन्हा सत्तेत आणू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चिकोडीचे माजी आमदार कल्लाप्पाण्णा मगेण्णावर म्हणाले, कार्यकर्त्यांना मोठे करणाऱ्या आमच्या पक्षाने राज्यात आणि देशातही मोठे कार्य केले आहे. हे कार्य जनतेसमोर मांडण्यासाठी जनता समावेश मेळावा होत असल्याचे सांगितले. अथणीचे माजी आमदार शहाजान डोंगरगांव म्हणाले, प्रादेशिक पक्ष असलेल्या निधर्मी जनता दलाने देशातील आणि कर्नाटक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. पक्षाने नेहमी देशातील आणि राज्यातील सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने काम केले आहे.
निपाणी तालुका अध्यक्ष प्रसन्नकुमार गुजर म्हणाले, पक्षाने तळागाळापर्यतच्या योजना राबवून राज्यात अनेक ऐतिहासिक कामे केली आहेत. या कार्याचा आढावा या मेळाव्यात होणार असून 27 रोजीच्या मेळाव्यात निपाणी मतदार संघातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी चिकोडी अध्यक्ष सुहास वाळके, किरण नागांवकर सुहास इंगळे, साजीदा पठाण, अय्याज पठाण, सुनिता सुतळे, महादेवी पाटील, रजिया भडगांवे, सुभाष माने, बाबासाहेब बागवाडे, दिपक बुवा, संपत खोत यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.