निपाणी नगरी वृत्तसेवा..(15)
आजच्या स्पर्धात्मक व तंत्रज्ञान प्रधान युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी दर्जेदार शिक्षणासोबतच आधुनिक सुविधा, शिस्तबद्ध वातावरण व संस्कारक्षम शिक्षणाची गरज असते. या सर्व बाबी यशस्वीपणे पुरवणारी मराठा मंडळ, बेळगाव संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूल, निपाणी ही शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे विश्वासार्ह केंद्र म्हणून ओळखली जात आहे.
मराठा मंडळ ही संस्था बेळगाव मधील सगळ्यात जुनी शैक्षणिक संस्था आहे. जी 1931 मध्ये स्थापित झालेली आहे. जी बेळगावतच नव्हे तर पूर्ण कर्नाटकमधील अग्रेसर शैक्षणिक संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहे. निपाणीतील पहिले इंग्लिश मीडियम स्कूल म्हणजे मराठा मंडळ संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूल ची स्थापना 1972 मध्ये झालेली आहे. मराठा मंडळ बेळगाव संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्यांबद्दल कर्नाटक राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
प्ले ग्रुपपासून ते दहावीपर्यंत शिक्षण देणारी ही शाळा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक व नैतिक विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. बालवया पासूनच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, जिज्ञासा व सृजनशीलता निर्माण करण्यावर शाळेचा विशेष भर आहे.
शाळेत प्रशस्त, स्वच्छ व हवेशीर वर्गखोल्या असून आधुनिक स्मार्ट क्लासरूम द्वारे डिजिटल अध्यापन केले जाते. संगणक शिक्षण, विज्ञान विषयासाठी आवश्यक प्रयोगात्मक सुविधा तसेच समृद्ध ग्रंथालय यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आवड व अभ्यासाची गोडी निर्माण होत आहे. तसेच शाळेमध्ये वि आर लॅब सुसज्ज आहे. अभ्यास क्रमासोबतच प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण देण्यावर शाळा भर देते. शाळेमध्ये स्काऊट गाईड व कप बुलबुल यांचेही प्रशिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांना फ्युचर कॉम्बॅक्ट फोर्सद्वारे सैनिकी प्रशिक्षण देऊन तयार करण्याचे काम करणारी ही निपाणीतील एकमेव शाळा आहे. फ्युचर कॉम्बॅट फोर्स द्वारे मुलांना मलखांब, लाठी काठी, तलवारबाजी, अग्नि कडा व जिप लाईन इत्यादी प्रशिक्षण दिले जाते.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी प्रशस्त खेळाचे मैदान, विविध इनडोअर व आउटडोअर खेळ, योग, प्राणायाम व क्रीडा उपक्रमांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व, निबंध, चित्रकला, हस्तकला, संगीत, नृत्य, सामान्य ज्ञान स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन आदी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो.
शाळेमध्ये जवळपास 600 पर्यंत विद्यार्थी शिकत आहेत. ग्रामीण भागातील पालकांचा कल हा नेहमीच या शाळेकडे आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या रिझल्ट वाढीसाठी शाळेकडून नेहमीच पहिल्यापासून महत्त्वाची पावले उचलली जातात. दहावीच्या विद्यार्थ्यांचे सकाळ-संध्याकाळ अतिरिक्त क्लासेस घेऊन प्रत्येक शिक्षकांकडून त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष पुरविले जाते.
शाळेतील ३९ अनुभवी, प्रशिक्षित व तळमळीचे शिक्षक विद्यार्थी घडवण्याचे पवित्र कार्य निष्ठेने पार पाडत आहेत. अभ्यासा सोबतच संस्कार, नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव व जीवन कौशल्ये रुजवण्यासाठी शिक्षक सतत मार्गदर्शन करतात. तसेच ११ शिक्षकेतर कर्मचारी, ३ संरक्षक पहारेकरी शाळेच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी कार्यरत असून शाळेचे शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरण कायम राखण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रथमोपचार सुविधा तसेच सुरक्षित व शिस्तबद्ध शालेय परिसर उपलब्ध आहे. नियमित पालक-शिक्षक संवाद व बैठकांमुळे पालकांचा शाळेशी दृढ संपर्क राहतो व विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवले जाते.
याबाबत शाळा व्यवस्थापनाचे मत आहे की,
“आमची शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून सुसंस्कृत, आत्मविश्वासी व जबाबदार नागरिक घडवणारे केंद्र आहे.” शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्ध व्यवस्थापन, अनुभवी शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांमध्ये दिसून येणारे सकारात्मक बदल यामुळे मॉडर्न इंग्लिश स्कूल, निपाणी ही पालकांची पहिली पसंती ठरत आहे.